2024 च्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासंबंधी मंथन करणार
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारची राजधानी पाटणा येथे 12 जून रोजी भाजपविरोधी पक्षांची मोठी बैठक होणार आहे. या बैठकीच्या अजेंड्याबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. परंतु पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात आव्हान निर्माण करण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांचे नेते विचारमंथन करणार आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी समान विचारसरणी असलेल्या सर्व भाजपविरोधी पक्षांना एकजूट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेतलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची त्यांनी अलिकडेच भेट घेतली होती.
तसेच नितीश कुमार यांनी दिल्लीत जात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी विरोधी पक्षांच्या एकजुटतेचे प्रयत्न गतिमान करणे आणि याच्या पुढील रुपरेषेवरून विस्तृत चर्चा करण्यात आली. लवकरच विरोधी पक्षांची एक बैठक आयोजित केली जाणार असल्याची घोषणाही तेव्हा करण्यात आली होती.