वृत्तसंस्था/ मांट्रीयल
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या नॅशनल बँक खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेसीका पेगुलाने सलग तिसऱ्या वर्षी महिला एकेरीची उपांत्यफेरी गाठताना आपल्याच देशाच्या कोको गॉफचा पराभव केला. आता पेगुला आणि पोलंडची स्वायटेक यांच्यात उपांत्यफेरीचा सामना होईल.
शनिवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पेगुलाने गॉफचा 6-2, 5-7, 7-5 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. पेगुलाचा गॉफवरील हा दुसरा विजय आहे. दुसऱ्या एका सामन्यात पोलंडच्या स्वायटेकने कॉलिन्सचा 6-3, 4-6, 6-2 असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली आहे. रशियाच्या सॅमसोनोव्हाने स्वीसच्या बेनसीकचा 6-4, 6-4 असा पराभव केला. तिसऱ्या फेरीतील सामन्यात सॅमसोनोव्हाने बेलारूसच्या सबालेंकाचा तर बेनसीकने झेकच्या क्वीटोव्हाचा पराभव केला होता.