ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अमित शाह यांचं सहकार क्षेत्रातील योगदान मोठं आहे. त्यांनी एखादा निश्चय केला की ते थांबत नाहीत. कारखान्यांचा 10 हजार कोटींचा कर माफ करण्याचा शाहांनी निर्णय घेतला असून, त्यांचं नेतृत्त्व सहकार विभागासाठी वरदान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केले.
अमित शाह दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी’ या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अमित शाह यांच्याकडून सहकार विभागात क्रांतीकारी निर्णय घेण्यात आले. त्यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे. नवं पोर्टल सहकार क्षेत्रातील नवा आयाम, सहकार क्षेत्रात कार्यकारी निर्णय घेतला आहे. शाहांनी एखादी गोष्ट ठरवली की ते करतातच. मोदी आणि शाहांमुळे देशात मोठे बदल होत आहेत. त्यांचं नेतृत्त्व सहकार विभागासाठी वरदान ठरत आहे.