विशेष प्रतिनिधी/सांगली
‘कौन बनेगा करोडपती’ला 21 वर्षांत अमिताभ बच्चन यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. पण, यावेळी त्यांनी माझी स्टाईल आवडली असं सांगितले. हा आपल्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे अभिनेते सचिन खेडेकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
‘कोण होईल मराठी करोडपती’चे नवे पर्व सोमवारी रात्री नऊ वाजता सोनी मराठीवर सुरू होत आहे. यानिमित्ताने खेडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, प्रत्येक सीजन नवा उत्साह आणि नवे काहीतरी शिकवणारा असतो. यावेळी मराठीचा सेट नवा आणि आगळावेगळा आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांचा प्रोमोही या सेटवर शूट झाला आहे. जेव्हा आपण त्यांची भेट घेतली तेव्हा भारावलेल्या स्थितीतच होतो. मात्र अत्यंत साधेपणाने अमिताभ बच्चन यांनी आपल्या मोठेपणाचे दर्शन घडवले. मी बोट उंचावून कोण होणार मराठी करोडपती असे म्हणण्याची जी स्टाईल बनवली आहे ती आपणास आवडली. त्याचा वापर आपणही करू असे बच्चन यांनी सांगितले. आपण 20 पेक्षा अधिक गोष्टी त्यांच्या सारख्या करतो. मात्र त्यांची दाद मला खूप महत्त्वाची वाटली. असे खेडेकर म्हणाले. असे कार्यक्रम यशस्वी होतात ते अभिनेत्यापेक्षाही सहभागी स्पर्धक व्यक्तीमुळे. प्रत्येक शनिवारच्या कार्यक्रमात लोकप्रिय मराठी व्यक्तिमत्वे सहभागी होतील.
पहिल्या भागात अभिनेत्री काजोल आणि त्यांच्या मातोश्री अभिनेत्री तनुजा असतील तर प्रसिद्ध लेखिका आणि उद्योगपती सुधा मूर्ती यांनीही पाहुणे म्हणून येण्यास होकार कळवला असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. यंदाच्या कार्यक्रमास एक आगळीवेगळी लाईफ लाईन असेल ज्यामुळे स्पर्धकाला एखादा प्रश्न पडला तर आवडीच्या क्षेत्रातील प्रश्न बदलून घेण्याची मुभा मिळणार आहे, शिवाय राज्यातील सर्व सामान्यांसाठी काम करणाऱ्या काही सेवाभावी संस्था आणि व्यक्तींच्या कार्याचेही या निमित्ताने दर्शन घडेल असे सांगताना खेडेकर यांनी यंदाच्या सीजनच्या सुरुवातीला ज्या स्पर्धकांचे अनुभव आले ते खूपच अवेगळे होते. काहींनी हसवले तर काहींनी अक्षरशः डोळ्यात पाणी उभे केले. अभिनेता म्हणून दुसऱ्याने लिहून दिलेले संवाद म्हणणे आणि अशा सच्चा कार्यक्रमातून सचिन खेडेकर म्हणून व्यक्त होता येणे हे या कार्यक्रमाचे वेगळेपण असल्याचेही त्यांनी सांगितले. कुटुंबातील सर्व व्यक्तींनी हा कार्यक्रम जास्तीत जास्त पहावा, सहभागी व्हावे, घरबसल्या खेळावे आणि ज्ञान व मनोरंजन मिळवावे असे आवाहनही खेडेकर यांनी केले आहे.