अन्नोत्सवात पार पडली मिसेस बेळगाव स्पर्धा
प्रतिनिधी /बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नोत्सवमध्ये विवाहित महिलांसाठी ‘सुपर वूमन मिसेस बेळगाव 2023’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक फेऱ्यांअंती अमृता रायबागी यांनी हा किताब पटकाविला. दिपाली सांबरेकर उपविजेत्या ठरल्या. आरती भाटिया यांनी तृतीय स्थान पटकाविले. स्पर्धेमध्ये अटीतटीची लढत झाल्याने विजेत्या कोण ठरणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.
सावगाव रोड, नानावाडी येथील अंगडी कॉलेजच्या मैदानावर 6 जानेवारीपासून अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले. चविष्ठ अन्नपदार्थांसोबतच महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सुपर वूमन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ब्यूटी विथ टॅलेंट अॅण्ड ब्रेन हे ब्रिदवाक्य घेऊन स्पर्धा आयोजित करण्यात आली. अन्नोत्सवाचे स्टेज चेअरमन मनोज मायकल यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा पार पडली. 35 वर्षांपेक्षा अधिक वयोमर्यादा असणाऱ्या विवाहित व बेळगावच्या रहिवासी असणाऱ्या महिलांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. कुकिंग, टॅलेंट व फिटनेस असे राऊंड घेण्यात आले. पाककला स्पर्धेमध्ये राही कुलकर्णी विजेत्या ठरल्या. परीक्षक म्हणून रोमा पाटील व मनीषा कक्केरी यांनी काम पाहिले.
टॅलेंट स्पर्धेत दिपाली सांबरेकर विजेत्या ठरल्या. अरुणा नाईक, अनुजा क्षीरसागर व रश्मी कुलकर्णी यांनी परीक्षण केले. फिटनेस स्पर्धेमध्ये डॉ. दिप्ती शेट्टी विजेत्या ठरल्या. हर्षद व तेजस कलघटगी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नताशा आजगावकर यांनी सर्व महिला स्पर्धकांना अंतिम फेरीच्या रॅम्प वॉकसाठी तयार केले.
शनिवारी अन्नोत्सवाच्या मुख्य स्टेजवर अंतिम फेरी पार पडली. सर्व गुणांच्या आधारे सुपर वूमनची निवड करण्यात आली. मिसेस गॅलेक्सी चाहत दलाल यांच्या हस्ते विजेत्यांना क्राऊन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला स्पर्धक उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रिती भंडारे, योगिनी नाईक व शिल्पा मनोज यांनी केले.