जैतापूर / वार्ताहर
राजापूर तालुक्यातील नाटे येथील पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान सतर्क पोलिसांनी वेळीच या पोलीस कर्मचाऱ्याला थांबवल्याने दुर्घटना टळली.
या बाबत नाटे मिळालेल्या माहितीनुसार, नाटे सागरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक मंगेश सीताराम राडे यांची एका प्रकरणात चौकशी सुरू होती. त्यांना समजपत्र देण्यात आले, मात्र समजपत्र न स्वीकारता त्यांनी नाटे पोलीस ठाण्यात येऊन प्रभारी अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर गोंधळ घातला तसेच आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली आहे.
मंगेश सीताराम राडे यांनी आपल्यावरील कारवाई चुकीची आहे, असे सांगत प्रभारी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तसेच पोलीस स्थानकाच्यासमोर उभे असलेल्या युनिकॉर्न गाडीतील नायलॉनची दोरी घेऊन गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब नंदकुमार पाटील यांनी याबाबतची फिर्याद नोंदवली आहे.