बेळगाव तालुक्यातील गावांमध्ये भगवेमय वातावरण : नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुर्गामाता दौडला आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव तालुक्यात दसरा उत्सवानिमित्त सोमवारपासून दुर्गामाता दौड मोठय़ा थाटामाटात सुरू करण्यात आली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने पहाटेपासून दुर्गामाता दौडीचे पूजन करण्यात आले. तालुक्यातील गावांमध्ये दौड मोठय़ा प्रमाणात काढण्यात आली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रत्येक गावातील कार्यकर्ते, मान्यवर व ग्रामस्थांच्या नेतृत्वाखाली झालेल्या दौडीमध्ये शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी डोक्मयावर भगवा फेटा व पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या तरुण-तरुणींनी देव, देश आणि धर्म जागृतीचा नारा देत दौडमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सांबरा
सांबरा येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा आयोजित श्री दुर्गामाता दौडला सोमवारी घटस्थापनेच्या शुभमुहुर्तावर उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन जि. पं. माजी सदस्य नागेश देसाई व देवस्थान कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजपूजन ग्रा. पं. सदस्य शंकर यड्डी यांनी केले. चौथरा पूजन कल्लाप्पा पालकर यांनी तर ता. पं. माजी सदस्य काशिनाथ धर्मोजी यांनी श्रीफळ वाढविले. शस्त्रपूजन पुंडलिक जत्राटी, विक्रम सोनजी, शशिकांत कोकितकर, भुजंग जोई, मारुती जोगानी व दौलत जोई यांनी केले. त्यानंतर ग्रा. पं. अध्यक्षा रंजना अप्पयाचे यांनी ध्वजाचे पूजन करून दौडीला चालना दिली. यावेळी प्रेरणामंत्र म्हणून दौडीला प्रारंभ करण्यात आला.
दौड छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मारुती गल्ली, लक्ष्मी गल्ली, भैरूदेव चौक, शुक्रवारपेठ, चावडी गल्ली, रेणुका गल्ली, मंगळवारपेठ, गणेशनगर, महादेव नगरमार्गे मेन रोडवरील मातंगी मंदिर येथे आली असता ध्येयमंत्राने दौडीची सांगता करण्यात आली. दौडीमध्ये विविध देव-देवतांच्या घोषणा देण्यात येत होत्या, स्फूर्तीगीते गाण्यात येत होती. गावामध्ये दौडीचे आरती ओवाळून जंगी स्वागत करण्यात आले. दौड जाणाऱया मार्गांवर आकर्षक रांगोळय़ा रेखाटण्यात आल्या होत्या. दौडमध्ये सहभागी सर्वांनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता. भगव्यामय वातावरणामध्ये काढण्यात आलेल्या दौडमध्ये पहिल्याच दिवशी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
उचगाव
आम्ही गडय़ा उचगावचे.. राहणार चाकर शिवबाचे… तुमचे आमचे नाते काय, जय भवानी जय शिवराय… बोल बजरंगबली की जय… अशा घोषणा, मार्गावर फुलांसह रेखाटलेल्या रांगोळय़ा, भगव्या पताका आणि भगवी, पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान करून भगव्या ध्वजाची आरती करणाऱया महिला अशा भगव्यामय वातावरणात उचगाव परिसरातील उचगाव, कोनेवाडी, बसुर्ते, तुरमुरी, अतिवाड, कल्लेहोळ, सुळगा या गावांमध्ये सोमवारी दुर्गामाता दौडीचा उत्साही वातावरणात शुभारंभ झाल्याचे चित्र दिसून आले.
उचगाव येथील मध्यवर्ती गांधी चौकातील गणेश विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या प्रांगणात सर्व युवक जमा झाले आणि सकाळी 6 वाजता दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. यावेळी गणपत गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मळेकरणी देवस्थान मार्ग, चव्हाट गल्ली, लक्ष्मी गल्ली, अनगोळ गल्ली, आंबेडकरनगर, मारुती गल्ली, नागेशनगर अशा विविध भागांमध्ये दौडीचे प्रस्थान झाले. पुन्हा गणेश, विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या प्रांगणात ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र होऊन पहिल्या दिवशीच्या दुर्गामाता दौडीची सांगता झाली. यावेळी उचगाव प्रमुख नेहाल जाधव, उचगाव विभाग प्रमुख मिथिल जाधव तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. दौडीमध्ये बालचमूंसह सर्वांनी सहभाग दर्शविला होता.
कंग्राळी बुद्रुक
छत्रपती शिवाजी महाराज की जय, दुर्गामाता माता की जय, भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात व शिवमय वातावरणात कंग्राळी बुद्रुक येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्यावतीने सोमवारी घटस्थापनेपासून दुर्गामाता दौडला मोठय़ा उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
प्रारंभी कंग्राळी बुद्रुक शिवप्रतिष्ठानचे शाखा अध्यक्ष कल्लाप्पा जाधव, ग्रा. पं. सदस्य प्रदीप पाटील, नवनाथ पुजारी, सदानंद चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील, ग्रा. पं. सदस्या भारता पाटील, वेदिका पठाणे, मेनका कोरडे, शकुंतला सिंग, वैभवी जाधव, वैष्णवी जाधव आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाचे पूजन करण्यात आले.
ग्रा. पं. सदस्य अनिल पावशे, दादासाहेब भदरगडे, नवनाथ पुजारी, दत्ता पाटील, प्रदीप पाटील यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. उपस्थित महिला ग्रा. पं. सदस्यांच्या हस्ते दुर्गामाता मूर्तीचे पूजन करण्यात आले. धारकरी निखिल भेकणे याच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन झाले. ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन करून दौडला प्रारंभ करण्यात आला.
दौड लक्ष्मी गल्ली, नेताजी गल्ली, कलमेश्वर गल्ली, बाहेर गल्ली, साईमंदिरमार्गे कलमेश्वर मंदिरकडे आल्यानंतर सांगता करण्यात आली. दौडमध्ये शिवप्रेमी व बालचमू मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. बसवंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रशांत पवार यांनी आभार मानले.
अलतगा
अलतगा येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्यावतीने सोमवारी घटस्थापनेपासून प्रतिवर्षाप्रमाणे मोठय़ा उत्साहात दौडला प्रारंभ करण्यात आला. यावेळी पुंडलिक पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन करण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मार्गदर्शक संजय मेणसे यांनी उपस्थित धारकऱयांना मार्गदर्शन केले.
धामणे परिसर
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने धामणे, सुळगा (ये.), देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी भागात दुर्गामाता दौडला सोमवारी उत्साहात सुरुवात करण्यात आली.धामणे येथे पहाटे 5.30 वाजता कलमेश्वर मंदिरात महादेवाचे आणि शस्त्रपूजन करून धारकरी सुमित जायाण्णाचे यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. त्यानंतर प्रेरणामंत्राने दुर्गामाता दौड हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय… या जयघोषात गावभर काढण्यात आली. यावेळी सुवासिनींनी आरती ओवाळून ध्वजाचे पूजन करून पुष्पवृष्टी केली. शेवटी बसवाण्णा मंदिर आवारात ध्येयमंत्र म्हणून धारकरी करण केरवाडकर यांच्या हस्ते ध्वज उतरवून दौडची सांगता करण्यात आली. या दौडमध्ये धामणे, ब्रह्मलिंगहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी, अवचारहट्टी येथील युवक-युवती मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
नंदिहळ्ळी
येथे यंदाही दुर्गामाता दौडीला उत्साही आणि भक्तिमय वातावरणात सोमवारी येथील दुर्गादेवी मंदिर येथून सुरुवात करण्यात आली. देवीचे व शस्त्रपूजन करून पेरणामंत्राने दौडला सुरुवात झाली. सर्व गल्ल्यांमध्ये फिरून महालक्ष्मी मंदिरात ध्येयमंत्राने दौडची सांगता झाली. याप्रसंगी यल्लाप्पा पाटील यांनी नवरात्रोत्सवाचे महत्त्व सांगितले.
देसूर
देसूर येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने सोमवारी येथील गणेश मंदिरात गणपती पूजन व शस्त्रपूजन करण्यात आले. विनायक पाटील यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आल्यानंतर प्रेरणामंत्राने दौडला सुरुवात करण्यात आली. प्रत्येक गल्लीत पुष्पवृष्टी करून दौडीचे स्वागत केले. गावभर फिरून शिवाजी चौकात आल्यानंतर दौडची सांगता करण्यात आली. दौडीमध्ये पंकज घाडी, अरुण काळसेकर, रामा जाधव, उत्तम पाटील, सागर ठोंबरे, नागराज सावंत, सुनील लोहार, नारायण नाईक, राहुल मासेकर व धारकरी, युवक-युवती मोठय़ा संख्येने सहभागी होते.
सुळगे-येळ्ळूर
सुळगे-येळ्ळूर येथे दुर्गामाता दौडला उत्साही वातावरणात सुरुवात झाली. राजहंसगडावरील सिद्धेश्वर मंदिरात शस्त्रपूजन होऊन ध्वज चढविण्यात आला. त्यानंतर गडावरून शिवज्योत घेऊन सुळगा (ये.) येथे गावभर दौड फिरून भावकेश्वरी मंदिर आवारात दौड पोहोचली. दौडीवेळी गावातील सर्व गल्ल्यांमध्ये रांगोळय़ा रेखाटण्यात आल्या होत्या. सुवासिनींनी आरती ओवाळून दौडीचे स्वागत केले.
तारीहाळ
तारीहाळ येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा, शस्त्रपूजन व ध्वजपूजन करून प्रेरणामंत्राने दौडला सुरुवात झाली. गावभर फिरून येथील रामेश्वर मंदिर आवारात आल्यानंतर ध्येयमंत्राने दौडची सांगता झाली. दौडमध्ये धारकरी, कार्यकर्ते व युवक-युवती सहभागी झाले होते.
कडोली
जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा देऊन संपूर्ण कडोली गावात विद्युत रोषणाई, भगव्या पताका आणि ध्वज लावून शिवप्रतिष्ठान आयोजित श्री दुर्गामाता दौडीबरोबर नवरात्र उत्सवाला मोठय़ा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. कडोलीचे ग्रामदैवत श्री कलमेश्वर देवालयाच्या वार्षिक उत्सवाला खऱयाअर्थाने नवरात्र उत्सवापासून प्रारंभ होत आहे. येथील कलमेश्वर मंदिरही विद्युत रोषणाईने उजळून गेले आहे.
श्री दुरदुंडेश्वर विरक्त मठात सोमनाथ पाटील, लक्ष्मण कदम यांच्या हस्ते शिवपूजन, ताशिलदार यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि अरविंद मायाण्णा यांच्या हस्ते शस्त्रपूजन झाल्यानंतर श्री दुर्गामाता दौडीला प्रारंभ करण्यात आला. या दौडीचे पेठ गल्ली, कलमेश्वर गल्ली, प्रभूनगर, पाटील गल्लीतील ग्रामस्थ आणि सुवासिनींनी आरती ओवाळून स्वागत केले. या दौडीत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सहभागी होते.