सांप्रतच्या काळात अनेक वस्तू अशा निर्माण करण्यात आल्या आहेत की ज्यांच्यामुळे आपले आयुष्य सुकर होत आहे. हे खरे असले तरी या वस्तू केव्हा, कशा आणि किती उपयोगात आणाव्यात. त्या उपयोगात आणतात कोणती दक्षता घ्यावी, हे देखील अतिशय गांभीर्याने पहावे लागते. अन्यथा आपली सोय व्हावी म्हणून निर्माण करण्यात आलेली वस्तू आपला घातही करु शकते. ही वस्तू फार महागडी किंवा जटील रचनेची असावी लागते असे नाही. अगदी साध्या वस्तू देखील योग्य प्रकारे न उपयोग केल्याने हानी करु शकतात. किटली ही अशीच एक वस्तू आहे. चहा किंवा पाणी गरम रहावे म्हणून तिचा उपयोग करतात. आजकाल बरेच लोक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नेहमी गरम पाणी पिण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे हॉटेलांच्या खोल्यांमध्ये किटली हमखास ठेवलेली असते. लोक या किटलीत स्वत:च पाणी भरुन गरम करुन घेतात.
तथापि, खोल्यांमध्ये ठेवलेल्या किटल्यांचा उपयोग करु नका, अशी सूचना वेटर्सनी केली आहे. या किटल्या स्वच्छ असल्या तरी त्या कशा उपयोगात आणयच्या हे माहीत नसल्यास त्यांचा उपयोग स्वत:हून करु नका, अशी माहिती दिली जात आहे. खोल्यांमध्ये ठेवलेल्या किटल्यांचा उपयोग काही लोक आपल्या अंडरवेअर धुण्यासाठी करतात. ते अशा किटल्यांमध्ये आपली धुण्याची अंडरवेअर टाकतात आणि पाणी घालून गरम करतात. नंतर अंडरवेअर काढून वाळवितात पण किटली तशीच अस्वच्छ ठेवतात. त्यांच्या नंतर या खोलीत रहावयास येणारे लोक त्याच किटलीत ती स्वच्छ न करता पाणी घालून गरम करतात आणि ते पाणी किंवा अन्य गरम पेये पितात. यातून त्यांना रोगराई होण्याचा धोका असतो.
म्हणून हॉटेलच्या खोल्यांमध्ये ठेवलेली किटली तशीच उपयोगात आणू नये. वेटरकडून नवी स्वच्छ किटली मागून घ्यावी, अशी सूचना प्रत्यक्ष अनेक वेटर्सनीच पेलेली असल्याने तिचे महत्व जाणणे सर्वांसाठी आवश्यक आहे.