ऑनलाईन टीम/तरुण भारत
Andheri East bypoll: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीसह (MVA) भाजप (BJP) आणि शिंदे गटात लढत होणार आहे. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. या दोघांनीही शक्तिप्रदर्शन करत आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, ऋतुजा (Rutuja Latke) लटकेंचा राजीनाम स्वीकारण्यास पालिकेने नकार दिल्याने काही काळ त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. यांनतर लटकेंनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला फटकारल्यानंतर त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. आता आज (१४ ऑक्टोबर) अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तर शिवसेनेनं सावध पवित्र घेत अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासोबतच संदीप नाईक यांचाही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके व भाजपकडून मुरजी पटेल मैदानात आहेत. आज लटके यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्यांच्या सोबतच दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निकटवर्तीय संदीप नाईक (Sandeep Nike) यांनीही अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर कुठलाही दगाफटका होऊ नये, या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ही खबरदारी घेतल्याचं समजतं.
हे ही वाचा : बेपत्ता पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह सापडला; आत्महत्या केल्याचा संशय
शिवसेनेचे विभागप्रमुख, आमदार अॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी या संदर्भात पत्रकारांना माहिती दिली. ‘हा एक नियम असतो. आयोगाच्या नियमानुसार एबी फॉर्ममध्ये पर्यायी उमेदवाराचं नाव समाविष्ट करता येऊ शकतं. अधिकृत उमेदवारानं काही कारणास्तव माघार घेतल्यास किंवा छाननीत त्याचा अर्ज बाद झाल्यास एबी फॉर्मवर नाव असलेला दुसरा उमेदवार अधिकृत म्हणून जाहीर केला जातो. त्या अनुषंगानेच संदीप नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र, ऋतुजा रमेश लटके याच शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत व त्या विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.