शहरासह जिल्ह्य़ात सर्व गणेशमंदिरात आकर्षक पूजा : विद्युत रोषणाई : भाविकांची दर्शनासाठी गर्दी
प्रतिनिधी/कोल्हापूर
अंगारकी संकष्टी भक्तिपूर्ण वातावरणात मंगळवारी शहरासह जिल्ह्य़ात साजरी झाली. विविध मंदिरात गणेशाची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. त्याचबरोबर काही गणेश मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई देखील केली होती. अंगारकी संकष्टी असल्याने शहरातील सर्वच गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. गणपतीला नारळ आणि मोदकासह अन्य गोड पदार्थांचा नैवद्य दाखवून भाविकांनी दर्शन घेतले. मंदिर परिसरात पूजेचे साहित्य विक्रेत्यांचाही आर्थिक फायदा झाला.
शहरातील अंबाबाई मंदिरातील गणपती चौकातील गणेश, गारेचा गणपती, बिनखांबी गणेश मंदिर, रंकाळा टॉवर येथील जाऊळाचा बालगणेश, भेंडे गल्लीतील गणेश, आर. के. नगरातील खडीचा गणपती, शाहू मिलजवळील पिंपळेश्वर गणेश, शाहूपुरी कुंभार गल्लीतील पंचमुखी गणेश, उमा टॉकीज चौकातील ओढय़ावरील गणेश, ट्रेझरी ऑफिसजवळील स्वयंभू गणेश, पितळी गणेश, प्रतिभानगरातील चांदीचा गणेंएड, संभाजीनगर गणेश मंदिर आदी मंदिरात श्रींची आकर्षक पूजा बांधण्यात आली. पूजाअर्चा झाल्यानंतर भाविकांनी उद, कापूर, फुले, नारळ, साखर, पेढे आणि मोदकांचा श्रींना नैवद्य दाखवून दर्शन घेत आपली मनोकामना पूर्ण करण्याची विनवनी केली. काही भाविकांनी प्रसाद म्हणून केळी, फळे, खिचडी, मोदक, पेढय़ांचे वाटप केले. भाविकांनी आपल्या घरात मोदकांसह गोडा-धोड जेवनाचा बेत केला होता. रात्री 8.48 वाजता चंद्रोदयानंतर भाविकांनी आरती करून संकष्टीचा उपवास सोडला.