ढगफुटी-जलप्रलयात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू, 1,200 हून अधिक घरांचे नुकसान
वृत्तसंस्था/ गंगटोक
सिक्कीममधील आणखी एक तलाव फुटण्याच्या मार्गावर आहे. राजधानी गंगटोकपासून 135 किमी अंतरावर असलेल्या लाचेन व्हॅलीतील शाको चू तलावाची स्थिती गंभीर आहे. जिल्हा प्रशासनाने आणीबाणी जारी करून धोक्याच्या भागातून लोकांना बाहेर काढण्यास सुरूवात केली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत या आपत्तीत प्राण गमावलेल्यांची संख्या 26 झाली आहे. बचावकार्य सातत्याने सुरू आहे.
3 ऑक्टोबर रोजी झालेल्या ढगफुटीनंतर तीस्ता नदीला आलेल्या पुरामुळे राज्यात अजूनही विध्वंस सुरू आहे. मंगन, गंगटोक, पाक्मयोंग आणि नामची या चार जिल्ह्यांचे पुरामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मंगनच्या लाचेन आणि लाचुंगमधील रस्ते वाहून गेल्याने 3,000 हून अधिक पर्यटक अडकून पडले आहेत. तथापि, झोंगू मार्गे चुंगथांगला जाणारा दुसरा मार्ग शोधला जात आहे. सध्या आयटीबीपी येथे बचावकार्य करत आहे. दरम्यान, ढगफुटी आणि जलप्रलयाच्या घटनेमुळे 25,000 लोक प्रभावित झाले आहेत. 1,200 घरे वाहून गेली आहेत. 10 हजार लोक वेगवेगळ्या भागात अडकले आहेत. तर आतापर्यंत 2,413 लोकांना वाचवण्यात यश आले आहे.
सहा हजारांहून अधिक लोक मदत छावण्यांमध्ये
राज्यभरात उभारण्यात आलेल्या 22 मदत छावण्यांमध्ये 6,875 लोक राहत आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याने त्यांची सोय सरकारकडून करण्यात आली आहे. बुरदांग परिसरातून बेपत्ता झालेल्या 23 लष्करी जवानांपैकी 7 जणांचे मृतदेह नदीच्या खालच्या भागातून बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही 15 जवानांसह एकूण 143 लोक अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी विविध यंत्रणांकडून कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.