विमान कोसळून एकंदर तिघांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडामध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात दोन भारतीयांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान एका झाडावर आदळल्यानंतर अपघात झाला. या विमानामध्ये दोन भारतीय शिकाऊ पायलट होते. त्यांची नावे अभय गद्रू आणि यश विजय रामुगाडे अशी आहेत. हे दोघेही मुंबई येथील रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आलेला आहे. स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.
कॅनडातील वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे हे विमान दुघर्टनाग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. विमान एका झाडावर आदळल्यानंतर हे दुर्घटनाग्रस्त विमान हॉटेल इमारतीच्या मागे कोसळले. पायपर पीए-34 सेनेका हे दुहेरी इंजिन असलेले हलके विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती कॅनडाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेत दोन भारतीय नागरिकांशिवाय आणखी एका वैमानिकाचाही या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तपास यंत्रणांनी घटनास्थळाची पाहणी केली असून अधिक तपास सुरू केला आहे. मात्र, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कॅनडाच्या वाहतूक सुरक्षा मंडळाने सखोल तपासासाठी घटनास्थळी पथक पाठवले आहे.