प्रतिनिधी /मडगाव
रस्त्यावरुन सायकलने जात असताना केलेल्या विनयभंगप्रकरणी आणि अटकेच्या भीतीने न्यायालयात धाव घेतलेल्या चिंचोणे येथील आर. डिसौझा या 25 वषींय संशयिताला कोलवा पोलिसांनी अटक केलीच तर अटींची पूर्तता केल्यानंतर जामिनावर सोडण्याचा मडगावच्या सत्र न्यायालयाने सोमवारी आदेश दिला.
25 हजार रुपयांच्या वैयक्तीक बॉण्डवर व तितक्याच रकमेच्या एका हमीदारावर संशयिताला जामिनावर सोडण्यात यावे त्याप्रमाणे या विनयभंग प्रकरणी पोलीस तपासात संशयिताने सहकार्य करावे, आरोपपपत्र दाखल करेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला पोलिसांसमोर हजर राहाव। या प्रकरणातील पुराव्याकडे ढवळाढवळ करता कामा नये त्याचप्रमाणे या न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोवा तसेच देशाबाहेर जाता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मडगावच्या सत्र न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रानुसार भर रस्त्यावर विनयभंगाची ही घटना 15 मे 2022 रोजी सायंकाळी 4.30 च्या सुमाराला तिबेट-केळशी येथे घडली. संशयित आरोपी दुचाकीवरुन जात असताना या संशयिताने तक्रारदार युवतीच्या छातीला हात लावला आणि तिचा विनयभंग केला.
या प्रकरणी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसानी या संशयिताचा शोधशोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. गुन्हा नोंद केल्यापासून संशयित पोलिसाना चुकवत आहे आणि त्यातूनच संशयिताने या न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला असे कोलवा पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले.
पोलीस तपासात पोलिसांनी सदर दुचाकी जप्त केली. एका निम सरकारी संघटनेच्या महिला पदाधिकाऱयासमोर पीडित युवतीची जबानी नोंद केली. या प्रकरणी प्रत्यक्ष साक्षीदार व इतरांची जबानी नोंद करायची आहे. तसेच पीडित युवतीची जबानी न्यायालयासमोर अजून नोंद न केल्याचे या न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले आणि म्हणून संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्यात यावा अशी कोलवा पोलिसांनी न्यायालयाकडे विनंती केली.
दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर वरील अटी घालून न्यायालयाने या संशयित अर्जदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.