क्रोएशियावर 3-0 फरकाने मात, मेस्सी, अल्वारेज यांचे गोल
वृत्तसंस्था/ लुसैल, कतार
स्टार फुटबॉलपटू लायोनेल मेस्सीने अर्जेन्टिना संघातून पुन्हा एकदा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून पहिले वर्ल्ड कप जेतेपद मिळविण्यासाठी तो आता सज्ज झाला आहे. येथे झालेल्या उपांत्य सामन्यात अर्जेन्टिनाने गतउपविजेत्या क्रोएशियाचा 3-0 असा पराभव केला. विजयी संघातर्फे मेस्सीने एक व ज्युलियन अल्वारेजने दोन गोल नोंदवले.
मेस्सीने पेनल्टीवर एक गोल नोंदवला तर अन्य दोन गोल नेंदवण्यासाठी साहय़ केले. आता रविवारी जेतेपदासाठी अर्जेन्टिनाची लढत मोरोक्को किंवा फ्रान्स यापैकी एका संघाविरुद्ध होईल. मेस्सीची या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2014 मधील स्पर्धेत अर्जेन्टिनाने अंतिम फेरी गाठली होती. पण त्यावेळी जर्मनीकडून पराभूत झाल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण यावेळी ती कसर भरून काढण्याचा प्रयत्न अर्जेन्टिना संघ करीत आहे. मेस्सी सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक असल्याचे मानले जाते आणि शेवटच्या वर्ल्ड कपमध्ये जेतेपद पटकावत निरोप घेण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.
‘या सर्व गोष्टी पाहून मनात भावनांचा कल्लोळ उठला असून डोक्यात अनेक विचार येत आहेत,’ असे मेस्सीने सामन्यानंतर म्हटले. चाहते, कुटुंबीय यांना पूर्ण स्पर्धेत पाहणे हा आनंददायक अनुभव आहे. आम्हाला अंतिम फेरी गाठायची होती आणि आता आम्ही तेथे पोहाचलो आहोत, असेही तो म्हणाला.
आपल्या अप्रतिम कौशल्याने मेस्सीने चाहत्यांना खुश करताना 69 व्या मिनिटाला अल्वारेजसाठी संघाच्या तिसऱया गोलची संधी निर्माण करून दिली. मेस्सी आपल्या संघाला तिसरे जेतेपद मिळवून देण्यासाठी मोटिव्हेट झाला असून त्याच्या खेळात त्याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. त्याने आतापर्यंतच्या सहा सामन्यात पाच गोल नोंदवले आहेत. याशिवाय त्याची एक पेनल्टीही हुकली आहे. त्याची ही सर्वोत्तम स्पर्धा ठरणार, असे मानले जात आहे.
क्रोएशिया मात्र सलग दुसऱयांदा अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरले. त्यांच्याकडून व्यवस्थित खेळ होत असताना 34 व्या मिनिटानंतर त्यांनी अर्जेन्टिनाला पाच मिनिटांच्या फरकाने दोन गोल करू दिल्याने मध्यंतरापर्यंत ते दोन गोलांनी मागे पडले. सामना संपल्याची शिटी वाजवल्यानंतर अर्जेन्टिनाचे प्रशिक्षक लायोनेल स्कॅलोनी यांच्या डोळय़ात अश्रू आले होते. मात्र अर्जेन्टाईन खेळाडूंनी आधीच्या सामन्याप्रमाणे मोठा जल्लोष केला नाही.
पूर्वार्धात मेस्सीबाबत चिंता वाटावी असा एक प्रसंग घडला. तो डाव्या मांडीला घट्ट धरून चोळताना दिसला तेव्हा त्याची धोंडशिर दुखावल्याची शंका येऊ लागली होती. मात्र तो मैदान सोडून गेला नाही, तेव्हा सर्वांना हायसे वाटले. नंतर तो क्रोएशियन खेळाडूंना आपल्या सोयीप्रमाणे खेळवू लागला आणि नंतर एका पेनल्टीवर त्याने गोल नोंदवून अर्जेन्टिनाला आघाडीही मिळवून दिली. अल्वारेजवर फाऊल झाल्यानंतर त्यांना ही पेनल्टी मिळाली होती. अल्वारेजने नंतर मेस्सीच्या शॉर्ट पासवर ताबा मिळवित आगेकूच केली संघाचा दुसरा व वैयक्तिक पहिला गोल नोंदवला. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट डिफेंडर म्हणून ओळखल्या जाणाऱया जोस्को ग्वार्डिओलला चकमा देत मेस्सीच्या पासवर 69 व्या मिनिटाला अल्वारेजने संघाचा तिसरा गोल करीत सामना क्रोएशियाच्या आवाक्याबाहेर नेला.
अर्जेन्टिनाने हा सामना जिंकून वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पराभूत न होण्याची मालिका कायम राखली असून अंतिम फेरी गाठण्याची त्यांची ही एकूण सहावी वेळ आहे.
मेस्सीचे विक्रम
मेस्सी हा अर्जेन्टिनाचा वर्ल्ड कपमध्ये विक्रमी गोल नोंदवणारा खेळाडू बनला आहे. या स्पर्धेतील तिसऱया पेनल्टीवर त्याने एकूण 11 वा गोल नोंदवत त्याने गॅब्रियल बॅटिस्टुटाला मागे टाकले. याशिवाय विश्वचषकातील त्याचा हा एकूण 25 वा सामना असून त्याने जर्मनीच्या लोथार मथायसशी बरोबरी केली आहे.
अल्वारेज
22 वर्षीय अल्वारेज सुरुवातीला अर्जेन्टिनाचा स्ट्रायकर नव्हता. गट साखळी फेरीतील तिसऱया सामन्यापासून लॉटेरो मार्टिनेझच्या जागी त्याला खेळविण्यात आले आणि आता त्याच्या नावावर चार गोल नोंद झाले आहेत. मेस्सी व एम्बापे यांचे प्रत्येकी 5 गोल झाले आहेत. वर्ल्ड कप उपांत्य फेरीत दोन गोल नोंदवणारा तो सर्वात युवा खेळाडू बनला आहे. यापूर्वी 1958 मध्ये ब्राझीलचे 17 वर्षीय पेले यांनी हॅट्ट्रिक नोंदवत असा पराक्रम करणारे पहिले सर्वात युवा खेळाडू बनले होते.