काटामारीच्या आरोपानंतर साखर संचालनालयाची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
उत्तर कर्नाटकातील 21 साखर कारखान्यांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले आहेत. काटामारीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर साखरमंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प यांच्या सूचनेवरून ऊस विकास व साखर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ही कारवाई केली. या कारवाईने एकच खळबळ माजली आहे.
यासंबंधी ऊस विकास व साखर आयुक्तांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. बेळगाव जिल्ह्यातील 8, बागलकोट जिल्ह्यातील 4, विजापूर जिल्ह्यातील 4, बिदर व गुलबर्गा जिल्ह्यातील प्रत्येकी 2 व कारवार जिल्ह्यातील 1 अशा 21 कारखान्यांवर छापे टाकण्यात आले असून यासंबंधीची कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यात प्रथमच साखर संचालनालयाकडून मोठ्या प्रमाणात छापे टाकण्यात आले आहेत. यासाठी साखर विभाग, अन्न व नागरी पुरवठा खाते, वेगवेगळे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाची मदत घेण्यात आली. बुधवारी सकाळी 7 पासून एकाच वेळी सर्वत्र छापे टाकण्यात आल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
काटामारीसंबंधी होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. या छापा सत्रातून नेमके काय बाहेर आले, याचा उलगडा झालेला नाही. बेळगाव जिल्ह्यातील अरिहंत शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड, (जैनापूर, ता. चिकोडी), अथणी शुगर्स लिमिटेड (अथणी), बेळगाव शुगर्स प्रा. लि. (हुदली), हर्षा शुगर्स लि. (ता. सौंदत्ती), लैला शुगर्स (भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखाना कुप्पटगिरी, ता. खानापूर), शिरगुप्पी शुगर वर्क्स लि. (शिरगुप्पी, ता. कागवाड), वेंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट लि. (बेडकीहाळ, ता. चिकोडी), विश्वराज शुगर्स इंडस्ट्रीज लि. (बेल्लद बागेवाडी, ता. हुक्केरी) या कारखान्यांवर छापे टाकण्यात आले आहेत.
बागलकोट जिल्ह्यातील बिळगी शुगर मिल लि. (ता. बिळगी), जेम शुगर्स लि., निराणी शुगर्स लि. (मुधोळ), प्रभूलिंगेश्वर शुगर्स लि. (सिद्धापूर, ता. जमखंडी), बिदर जिल्ह्यातील बिदर किसान साखर कारखाना लि., (मोदगल), महात्मा गांधी सहकारी साखर कारखाना नि. (ता. भालकी), गुलबर्गा जिल्ह्यातील रेणुका शुगर्स (हावळग, ता. अफजलपूर), एनएसएल शुगर्स (भोसनूर, ता. आळंद), विजापूर जिल्ह्यातील इंडियन शुगर मॅन्युफॅक्चरिंग लि. (हाविनाळ, ता. इंडी), जमखंडी शुगर्स लि. (प्रकल्प-2, नादकेडी), केपीआर शुगर्स मिल्स (आलमेल, ता. शिंदगी), बसवेश्वर शुगर्स लिमिटेड (कारजोळ, ता. बसवण बागेवाडी), कारवार जिल्ह्यातील ईआयडी पॅरी इंडिया लि. (हल्याळ, ता. जोयडा) या कारखान्यांवरही छापे टाकण्यात आले आहेत.