पाक प्रसारमाध्यमाचा दावा ः पत्नीचे उत्पन्न दुप्पट ः निवृत्तीच्या 8 दिवसांपूर्वी खुलासा
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानी सैन्य प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे कुटुंब 6 वर्षांमध्ये अब्जाधीश झाल्याचा दावा तेथील प्रसारमाध्यमांनी केला आहे. बाजवा यांचा कार्यकाळ संपण्याच्या 8 दिवसांपूर्वी हा खुलासा झाला आहे. बाजवा यांचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे.
मागील 6 वर्षांमध्ये बाजवा यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांनी कराची, लाहोर समवेत पाकिस्तानातील मोठय़ा शहरांमध्ये फार्म हाउस तयार करविले आहेत, आंतरराष्ट्रीय व्यवसाय अन् कमर्शियल कॉम्प्लेक्स निर्माण केले आहेत. तसेच विदेशात मोठय़ा प्रमाणात मालमत्ता खरेदी केल्या आहेत. या मालमत्तांची किंमत सुमारे 1200 कोटी रुपयांहून अधिक आहे. याचे व्यवहार बाजवा यांच्या पत्नी आयशा अमजद, सून महनूर साबिर आणि कुटुंबाच्या काही निकटवर्तीयांच्या नावावर झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
आयशा अमजद यांच्या नावावर 2016 मध्ये 8 नव्या मालमत्ता खरेदी करण्यात आल्या. त्यावेळी बाजवा हेच सैन्यप्रमुख होते. अशाचप्रकारे बाजवा यांची सून महनूर साबिरच्या नावावर अनेक मालमत्ता खरेदी करण्यात आल्या आहेत. 2018 मध्ये विवाहाच्या एका आठवडय़ातच महनूरचे उत्पन्न शून्यापासून सुमारे एक अब्ज झाले आहे. पाकिस्तानात सैन्यप्रमुखच सर्वात शक्तिशाली व्यक्ती असतो. तेथील निवडून आलेले सरकार देखील सैन्याच्या इशाऱयावर काम करत असते.