यू-17 गटात आदित्य शिंगणमुखी उपविजेता तर यू-13 गटात रणवीरला कांस्य
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हुबळी येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत बेळगावच्या राजन्स बॅडमिंटन अकादमीचे खेळाडू अर्णा असुंडी, आदित्यी असुंडी यांनी विजेतेपद तर आदित्य शिंगणमुखी याने उपविजेतेपद व रणवीर मोहिरेने कांस्यपदक मिळविले.
हुबळी येथे आयोजित राज्यस्तरीय अग्रमानांकित बॅडमिंटन स्पर्धेत 11 वर्षांखालील मुलींच्या एकेरीत बेळगावच्या राजन्स अकादमीची खेळाडू अर्णा असुंडी हिने अंतिम सामन्यात साची जी. हुबळी हिचा 2-1 असा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. तिने 22-20, 21-23, 23-21 असा विजय मिळवित विजेतेपद पटकाविले.
13 वर्षांखालील मुलींच्या एकेरीत आदित्यी असुंडी हिने कर्नाटकाची अग्रमानांकित खेळाडू रीती शेट्टीचा कडव्या लढतीत 2-1 असा पराभव केला.
या सामन्यात शेवटच्या गेममध्ये 20-16 ने रिती शेट्टी आघाडीवर होती. पण त्यानंतर आदित्यीने उत्कृष्ट खेळ करीत हा गेम 23-21 असा जिंकला. तिने 14-21, 21-7, 23-21 असा विजय मिळवित विजेतेपद पटकाविले.
17 वर्षाखालील मुलांच्या एकेरीत आदित्य शिंगणमुखीला अंतिम सामन्यात शिवराज (सिंदनूर) याच्याकडून 21-18, 15-21, 19-21 असा पराभव स्वीकारावा लागल्याने आदित्यला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
13 वर्षाखालील मुलांच्या एकेरीत रणवीर मोहिरेला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीच्या लढतीत प्रदीप सिंग (बेळ्ळारी) याने रणवीरचा 17-21, 16-21 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. रणवीरला या सामन्यात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
आदित्य असुंडी व अर्णा असुंडी या सेंट जोसेफ स्कूलमध्ये शिकत असून आदित्य शिंगणमुखी हा केएलई इंटरनॅशनल शाळेत तर रणवीर मोहिरे जैन स्कूल येथे शिकत आहे. या सर्वांना राजन मोहिरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.