सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांची धडक मोहीम
सावंतवाडी : प्रतिनिधी
तेरेखोल नदीपात्रातील भागात खाडीलगत आरोंदा सावरजुवा भागात बेकायदा घुसखोरी करून गोवा हद्दीतील वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरूआहे. आज शनिवारी सकाळी सहा वाजता सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील आणि त्यांची टीम व पोलीस यंत्रणा यांना एकत्रितरित्या तेरेखोल नदी पात्रात एक होडी वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ या यंत्रणेने सदर वाळू उपसा करणाऱ्या होडी चा पाठलाग केला असता सदर वाळू तस्करी करणारे गोवा हद्दीत पळून गेले. सदर गोवा हद्दीतील वाळू तस्करी करणाऱ्या व्यक्तीने आपल्या होडीसह पलायन केले. मात्र वाळू उपसा करणारे साहित्य ते महाराष्ट्र हद्दीत टाकून पळाले. सदर साहित्य जप्त करण्यात आले आहे. वाळू रॅम्प व इतर साहित्य जाळून नष्ट करण्यात आले. सदरची धडक मोहीम तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली दाणोली तलाठी श्री. भाऊसाहेब चितारे ,आरोंदा तलाठी श्री. पोले , आरोंदा उपसरपंच श्री. सुभाष नाईक,आरोंदा कोतवाल श्री. जाधव व पोलीस कर्मचारी श्री. दळवी उपस्थित होते . तसेच महसूल पथकाला पाहताच वाळू उपसा करणाऱ्या होड्यांनी गोवा हद्दीत पळ काढला. मात्र या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपूर्वीच महसूल विभागाने अशी धडक मोहीम राबवली होती. आज पुन्हा मोहीम राबवण्यात आली. मात्र वाळू तस्करी करणाऱ्या टोळीने पलायन करण्यात यश मिळवले. मात्र पुन्हा एकदा अशी धडक मोहीम राबवून पळ काढणाऱ्या गोवा हद्दीतील वाळू तस्करी यांना जेरबंद करण्यात यश मिळवू असा विश्वास श्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान तेरेखोल नदीपात्रात परवानगी नसताना होडी कशा काय उतरतात याबाबत मेरीटाईम बोर्डाने याकडे लक्ष देऊन सदर पाण्यात उतरणाऱ्या होडी व बोटी यांना परवानगी आहे का याची तपासणी करणे आवश्यक आहे. आणि अशी जर तपासणी मेरीटाईम बोर्डाने केली तर निश्चितपणे अनधिकृतपणे वाळू तस्करी करणाऱ्या टोळीला आळा बसेल. सदर नदीपात्रात गोवा भागातील तस्करीधारक होडी उतरवत आहेत . त्यांचा पाठलाग करत असताना महाराष्ट्रातील आणि विशेषतः सिंधुर्गातील महसूल यंत्रणेकडे सुविधा आहेत. परंतु बोट चालवणारे प्रशिक्षित नाहीत. त्यामुळे तस्करी करणाऱ्यांचे फावत आहे.