उंब्रज/प्रतिनिधी
उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोव्हेंबर १९८७ मध्ये पोर्णिमेच्या दिवशी पाल ता. कराड येथे खुनाचा गुन्हा घडला होता. मनव ता. कराड येथील भिमराव सिध्द्राम तेली रा. मनव ता. कराड याचा त्याच गावातील बाळू सरगर, दत्तु यलमारे वगैरे लोकांनी सन १९८३ मध्ये खुन केलेला होता. आरोपी लाला सिध्द्राम तेली, संपत सिध्द्राम तेली, महादेव सिध्द्राम तेली, वदत्तु आण्णा तेली सर्व रा. मनव ता. कराड यांनी पाल ता. कराड येथे सदर गुन्हयातील मयत दत्तु ज्ञानु यलमारे रा.मनव ता.कराड याचा कोयता, कु-हाड या सारख्या घातक हत्याराने मारुन निघुर्ण खुन केला होता. त्याबाबत गुन्हा उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल होता.
सदर गुन्हयातील आरोपी लाला सिध्द्राम तेली हा गुन्हा घडल्यापासून सुमारे ३६ वर्ष परागंदा झालेला होता. दि. २९/०९/२०२३ रोजी कराड शहरात गणेशोत्सव बंदोबस्ता करीता हजर असताना अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नमूद गुन्हयातील परागंदा आरोपी लाला सिध्द्राम तेली रा. मनव ता. कराड हा त्याच्या राहते घरी आलेला आहे. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास कडव यांच्या पथकास बातमीची खात्री करुन, सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास पोलीस ठाण्यास हजर करण्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे सदर पथकाने मनव ता. कराड येथे जावून सापळा लावून संशयितास त्याच्या राहत्या घरातून मध्यरात्रीचे सुमारास शिताफीने पकडून पुढील कार्यवाहीसाठी उंब्रज पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथील वाचक पोलीस उपनिरीक्षक विश्वास कडव, सहा. पोलीस उपनिरीक्षक, नितीन शेळके, मकरंद कवडे, पो.हवा. राकेश देवकर, पो. ना. गणेश जाधव, चालक पोलीस नाईक उदय यादव, पो. कॉ. आशिष पाटील यांनी सहभाग घेतला.