प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण केले जात असल्याने मागील दोन ते तीन वर्षांपासून ‘पे ऍण्ड पार्किंग’ची व्यवस्था बंद होती. आता पुन्हा एकदा रेल्वे स्थानकावर पार्किंगची व्यवस्था केल्याने जवळचा प्रवास करणाऱयांना वाहने पार्किंगला लावून रेल्वेने प्रवास करणे सोयीचे होत आहे. दुचाकीसोबतच चार चाकी वाहन पार्किंगची व्यवस्था केली आहे.
रेल्वे स्थानकावर ‘पे ऍण्ड पार्किंग’ची व्यवस्था नसल्याने अस्ताव्यस्त पार्किंग होत होते. यामुळे बऱयाचवेळा नाराजीही व्यक्त होत होती. तसेच बऱयाचवेळा रेल्वेस्टेशन बाहेर लावण्यात आलेल्या वाहनांमधील पेट्रोल काढण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे रेल्वे स्थानकात ‘पे ऍण्ड पार्किंग’ची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात होती. बरेच प्रवासी सकाळी वाहने पार्किंगला लावून रेल्वेने प्रवास करून पुन्हा संध्याकाळी परततात. अशा नागरिकांना पार्किंग नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.
मागील महिन्यात नैर्त्रुत्य रेल्वेकडून पे ऍण्ड पार्किंगसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. श्री रेणुकादेवी एन्टरप्राइझेस या कंपनीला 2025 पर्यंत पे ऍण्ड पार्किंगचे कंत्राट दिले आहे. 6 तास दुचाकी पार्किंगसाठी 5 रूपये आकारले जात आहेत तर चार चाकीसाठी 10 रूपये आकारण्यात येत आहेत. रेल्वे कर्मचाऱयांना दुचाकीसाठी मासिक 50 रूपये तर सामान्य नागरिकांना दुचाकीसाठी मासिक 150 रु आकारले जात आहेत.