उमर रोटीवाले उत्कृष्ट खेळाडू, प्रज्वल माने उत्कृष्ट गोलरक्षक पुरस्काराचे मानकरी
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
गुडशेफर्ड स्कूल आयोजित वेणुग्राम सहोदया सीबीएसई आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लव्हडेल संघाने कॅन्टोन्मेंट संघाचा टायब्रेकरमध्ये 5-4 असा पराभव करून वेणुग्राम सहोदया सीबीएसई चषक पटकाविला. उमर रोटीवालेला उत्कृष्ट खेळाडू तर प्रज्वल मानेला उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले.
गुडशेफर्ड मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात लव्हडेल संघाने ज्योती सेंट्रल संघाचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात लव्हडेलतर्फे सहीम दफेदार व उमर रोटीवाले यांनी गोल केले तर ज्योतीतर्फे राजेश पाटीलने गोल केला. दुसऱया उपांत्य सामन्यात कॅन्टोन्मेंट संघाने गुडशेफर्ड संघाचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात कॅन्टोन्मेंटतर्फे झियान बेपारीने 2 तर फरहान दड्डी व उमर रोटीवाले यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
अंतिम सामन्यावेळी प्रमुख पाहुणे राजू गदक व प्राचार्या के. सरला यांना लव्हडेल व कॅन्टोन्मेंट संघांच्या खेळाडूंची ओळख करून दिल्यानंतर सामन्याला सुरूवात करण्यात आली. या सामन्यात 28 व्या मिनिटाला कॅन्टोन्मेंट संघाच्या बचावपटूच्या हाताला चेंडू लागल्याने पंचानी लव्हडेल संघाला पेनल्टी बहाल केली. त्यावर सुदर्शन महाडिकने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 48 व्या मिनिटाला उमर रोटीवालेच्या पासवर आयान संपगावकरने कॅन्टोन्मेंटचा बरोबरीचा गोल नोंदवला. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत राहिल्यानंतर पंचांनी टायब्रेकरचा वापर केला. त्यात लव्हडेल संघाने 5-4 अशी बाजी मारत विजेतेपद पटकाविले. लव्हडेलतर्फे विराज कन्नूरे, सहीम दफेदार, आदित्य पाटील, यश रामण्णावर यांनी गोल केले तर प्रज्वल माने या गोलरक्षकाने दोन फटक्यावर अप्रतिम बचाव करीत संघाला विजय मिळवून देण्यास सिंहाचा वाटा उचलला. कॅन्टोन्मेंटतर्फे झियान बेपारी, उमर रोटीवाले, ध्रुव मादीक यांनी गोल केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे राजू गदक, के. सरला, इमरान बेपारी यांच्या हस्ते विजेत्या लव्हडेल संघाला व उपविजेत्या कॅन्टोन्मेंट संघाला चषक, प्रमाणपत्र व सर्व खेळाडूंना पदके देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू उमर रोटीवाले (कॅन्टोन्मेंट), उत्कृष्ट गोलरक्षक प्रज्वल माने (लव्हडेल), उगवता खेळाडू साई गवळी (गुडशेफर्ड) यांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून अमित चौरिया, अभिषेक चेरेकर, कौशिक पाटील, समर्थ बांदेकर, साहिलकुमार सिंग यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इमरान बेपारी, रंजना सडेकर, निलेश सांवगांवकर यांनी विशेष परिश्रम घेतले.