धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल : मागणीत वाढ मात्र दर घसरले
बेळगाव : नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे फळा, फुलांची आवक वाढू लागली आहे. विशेषत: अशोकनगर येथील होलसेल फुलमार्केटमध्ये फुलांची आवक वाढू लागली आहे. दररोज 30 टनहून अधिक फुले दाखल होवू लागली आहेत. दसऱ्या दिवशी सर्वाधिक आवक होणार असल्याची माहितीही फुल विक्रेत्यांनी दिली आहे. मात्र फुलांचे दर घसरले आहेत. नवरात्रोत्सवात दौड, रास, गरबा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे फुलांची मागणी वाढू लागली आहे. झेंडू, शेवंती, गुलाब, एस्टर आदी फुलांची विक्री होवू लागली आहे. विशेषत: झेंडूची आणि शेवंती फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यरगट्टी, नेसरगी, गोकाक येथून फुले दाखल होवू लागली आहेत.
होलसेल फुल बाजारात झेंडू 10 ते 20 रुपये किलो, शेवंती 80 रुपये किलो, गुलाब 150 रुपये किलो, एस्टर 120 रुपये किलो असा फुलांचा दर आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मागणी वाढली असली तरी फुलांचे दर घसरले आहेत. त्यामुळे उत्पादकांना फटका बसला आहे. होलसेल फुल बाजारात आवक अधिक असल्याने किरकोळ बाजारात फुलांची रेलचेल पहावयास मिळत आहे. फुल बाजारात विविध जातीची आकर्षक फुले पहावयास मिळत आहेत. पहाटे फुलांसाठी लिलाव प्रक्रिया होत आहे. त्यानंतर काही फुले शिल्लक राहू लागली आहेत. या शिल्लक फुलांसाठी मनपाने अगरबत्ती तयार करण्यासाठी प्रकल्प तयार केला आहे. मात्र अद्याप या प्रकल्पाला सुरुवात न झाल्याने शिल्लक फुले कुजताना दिसू लागली आहेत.
फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री
नवरात्रोत्सवात फुलांची आवक वाढू लागली आहे. झेंडू, शेवंती आणि इतर फुलेही दाखल होवू लागली आहेत. दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. सद्या झेंडूंची किंमत कमी झाली आहे.
– महांतेश मुरगोड-बागायत खाते सहसंचालक