जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची पूर्वतयारी बैठकीत माहिती
बेळगाव : कित्तूर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठी किल्ल्यावर विद्युत रोषणाई व स्वच्छता काम गतीने राबविण्यात येत आहे. याबरोबरच व्यासपीठ, कुस्तीचे मैदान, जेवण व्यवस्था, वस्तू प्रदर्शन, बोटिंग आदी व्यवस्था करण्याच्या कामाला गती देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी कित्तूर किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पूर्वतयारी बैठक घेतली. कित्तूर उत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. वेळ कमी असला तरी प्रत्येक कामाची पाहणी करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेऊन कामे वेळेत पूर्ण करावी, अशी सूचना केली.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी मिरवणूक झाल्यानंतर दुपारी निच्चनके मठाच्या आवारात जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. उर्वरित दिवशी रात्री जेवणाची व्यवस्था केली जाईल तसेच उत्सवात सहभागी होणाऱ्या कलाकारांसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले. किल्ल्याच्या आवारात स्वच्छताकामे त्वरित पूर्ण करावी, वस्तू प्रदर्शन, फल, पुष्प प्रदर्शन, श्वान प्रदर्शन आदी व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले.उत्सवादरम्यान येणाऱ्या नागरिकांना सोयीचे व्हावे यासाठी एलईडी स्क्रीन, खुर्चींची व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचेही सांगितले. यावेळी बैलहोंगलचे प्रांताधिकारी प्रभावती, कन्नड व संस्कृतिक खात्याच्या संचालक विद्यावती बजंत्री, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक श्रीशैल कंकणवाडी, वार्ताखात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, डीवायएसपी रवी नायक, कित्तूर पोलीस निरीक्षक महांतेश होसपेटी आदी उपस्थित होते.