हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची उपस्थिती
वार्ताहर/ मडकई
नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाटय़ समाज संस्थेसाठी सातत्याने काम करणारी मंडळी खरोखरच कौतुकास्पद आहेत. यांच्या अमूल्य अशा योगदानामुळे संस्था भरभराटीस आलेली आहे. त्यामुळे संस्था गोव्याच्या नाटय़ इतिहासात ठसा उमटवू शकली. अशा कलाकारांचा सन्मान फोंडय़ातील राजीव गांधी कलामंदिरमध्ये आज शनिवार 10 रोजी सायं. 6 वा. करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा रंगकर्मी अजित केरकर यांनी दिली. संस्थेचे हे अमृतमहोत्सवीपर्यंत अनेक कलाकारांनी कलाविष्कार दाखवला. त्यांच्या कार्यामुळेच संस्था गोव्याच्या नाटय़ इतिहासात मैलाचा दगड ठरली, असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले.
कलाकारांचे योगदान अधोरेखित करणे संस्थेचे कर्तव्य ठरते. त्यांच्या अलौकिक कार्यामुळे संस्था अमृतमहोत्सवीपर्यंत वाटचाल करू शकली. अशा कलाकारांचा संस्थेला व आपल्याला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया संस्थेविषयी बोलताना अजित केरकर यांनी व्यक्त केली.
नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाटय़ समाज संस्थेचा आज शनिवार 10 रोजी अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर उपस्थित असतील. प्रमुख वक्त्या म्हणून सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, राजे सौंदेकर मधुलिंग नागेश वडियार, नागेश संस्थाचे अध्यक्ष दामोदर भाटकर, कार्याध्यक्ष वीजमंत्री सुदिन ढवळीकर आदी उपस्थित असतील. संस्थेसाठी सातत्यपूर्ण व विशेष योगदान दिलेल्या 14 कलाकारांचा, 2 संस्था, 3 मरणोत्तर सन्मान करण्यात येणार आहे.
या कलाकारांच्या मांडयाळीत फोंडय़ाचे प्रसिद्ध नेपथ्यकार दास कवळेकर, निवृत्त अधीक्षक अभियंते व कलाकार दिलीप ढवळीकर, चतुरा रायकर, रामदास नाईक, सिद्धी उपाध्ये, प्रभाकर उर्फ आबा केरकर, शशिकांत नाईक, गायत्री सिद्धये, मंगलदास नाईक, वीणा गावणेकर, सुबोध कुर्पासकर, संतोष केरकर, अरुण काळे व अशोक नाईक तर उत्कृष्ट संस्था म्हणून कपिलेश्वरी सम्राट क्लब, रवळनाथ प्रासादिक नाटय़ मंडळ बांदिवडे तर मरणोत्तर कै. गोविंद उर्फ बाळू मामा उपाध्ये, कै. गणपत दाते, कै. नारायण कामत बुडकुले आदींचा सन्मान करण्यात येईल.
नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाटय़समाजाच्या या अमृतमहोत्सव कार्यक्रमाला रसिकांनी आवर्जुन उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष केरकर यांनी केले आहे.