चंदीगढ / वृत्तसंस्था
निस्पृहता आणि प्रामाणिकपणामुळे नेहमीच चर्चेत असलेले हरियाणाचे आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची 55 व्या वेळेला बदली करण्यात आली आहे. यावेळी त्यांना राज्याच्या संग्रहण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ते 1991 पासून प्रशासकीय सेवेत आहेत.
त्यांच्या 31 वर्षांच्या सेवेत त्यांच्या 55 बदल्या करण्यात आल्या आहेत. हा एक विक्रमच असावा अशी चर्चा आहे. एका जागेवर त्यांना पूर्ण 1 वर्षही काम करु देण्यात आलेले नाही. त्यांची 54 वी बदली ऑक्टोबर 2021 मध्ये करण्यात आली होती. यावेळी त्यांना संग्रहण विभागातून हलवून विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात नियुक्त करण्यात आले होते. आता त्यांना पुन्हा संग्रहण विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून आणण्यात आले आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांना या पदावर पदोन्नती देण्यात आली होती. त्यांच्या बदलीसाठी कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. त्यांच्या बदल्या हा प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.