गर्दीत हल्लेखोराने रोखली बंदूक ः ट्रिगर अडकल्याने वाचल्या उपाध्यक्ष
वृत्तसंस्था/ ब्युनॉस आयर्स
अर्जेंटीनाच्या उपाध्यक्ष क्रिस्टिना फर्नांडिस यांच्यावर एका इसमाने गोळीबाराचा प्रयत्न केला, परंतु पिस्तुल त्यावेळी न चालल्याने त्या बचावल्या आहेत. ही घटना गुरुवारी रात्री घडली आहे. क्रिस्टिना स्वतःच्या घराबाहेर समर्थकांच्या गर्दीत असताना एका इसमाने त्यांच्यावर बंदूक रोखली होती. गोळी झाडली गेली असती तर क्रिस्टिना यांना जीव गमवावा लागला असतो. हल्लेखोराला पोलिसांनी अटक करत चौकशी सुरू केली आहे.
हल्लेखोराकडील बंदुकीत 5 गोळय़ा होत्या. ट्रिगर अडकल्याने त्याला गोळीबार करता आला नव्हता. याचमुळे क्रिस्टिना यांचा जीव वाचला आहे. आरोपी हा ब्राझीलमध्ये राहणारा असून त्याचे नाव फर्नांडो आंद्रे सबाग मोंटिएल असल्याची माहिती अध्यक्ष अल्बटों फर्नांडिस यांनी दिली आहे. हल्लेखोराने बंदूक रोखल्यावर खळबळ उडाली होती. संशयित क्रिस्टिना यांच्यासमोर येताच सुरक्षारक्षकांनी सक्रीय होत त्याला अटक केली आहे.
क्रिस्टिना या 2007-2015 दरम्यान अर्जेंटीनाच्या अध्यक्ष राहिल्या आहेत. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप झाले होते. या आरोपांप्रकरणी अद्याप सुनावणी सुरू आहे. क्रिस्टिना यांच्यावरील खटल्यांच्या विरोधात त्यांचे समर्थक रॅली काढत होते. क्रिस्टिना यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे.
भ्रष्टाचार अन् फसवणुकीच्या आरोपांना तोंड देणाऱया क्रिस्टिना यांना 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलाने केली आहे. 2007-15 या कालावधीत अध्यक्षपदी असताना शासकीय निधी दुसऱयाच कारणासाठी वापरल्याचा आरोप आहे. परंतु देशात त्यांना मोठे समर्थन मिळत असल्याचे चित्र आहे.
अर्जेंटीनात महागाईचे संकट
अर्जेंटीना सध्या 20 वर्षांमधील उच्चांकी महागाईला तोंड देत आहे. सरकारने महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल केले आहेत. 71 टक्क्यांच्या महागाई दराला सामोऱया जाणाऱया अर्जेंटीनासमोर आर्थिक संकटाचे आव्हान उभे राहिले आहे. तसेच देशातील महागाई दर 90 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अनुमान आहे. देशातील मध्यवर्ती बँकेने चलनाची छपाई करण्यास नकार दिला आहे. गगनाला भिडणाऱया महागाईमुळे जनतेत मोठा संताप दिसून येत आहे.