मोतीडोंगर येथील आरोपीला काही तासातच अटक
प्रतिनिधी /राय
अनैतिक संबंध उघड होण्यापूर्वीच पुरावा नष्ट केलेला बरा या हेतूने नात्याने काका असलेल्या संशयित आरोपीने आपल्याच सख्या पुतण्याला आमीष दाखवून एका निर्जन जागी नेऊन सुमारे 35 फूट खोल असलेल्या विहीरीत ढकलून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस येताच संशयिताला अटक करण्यात आली आहे.
मायणा -कुडतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव बसवराज कागी (45) असे असून हा आरोपी मोतीडोंगर -मडगाव परिसरात राहणारा आहे.
आरोपी बसवराज याचे त्याच्या अत्यंत जवळच्या एका नातलगाकडे अनैतिक संबंध होते आणि या संबंधाची माहिती या प्रकरणातील अल्पवयीन मुलाला होती.
एका झाडाला चांगले आंबे लागलेले आहेत असे सांगून या आरोपीने नात्याने पुतण्या असलेल्या आपल्या अल्पवयीन नातलगाला कुडतरी येथील जंगलातील निर्जन जागी नेले आणि एका 35 फूट खोल असलेल्या विहीरीत ढकलून दिले.
सध्या हिवाळय़ाचे दिवस असल्यामुळे विहीर कोरडी झालेली. योगायोग असा की या विहीरीत वर येण्यासाठी धरणाला ज्या प्रमाणे दगड असतात त्याप्रमाणे दगड होते. या दगडांच्या साहाय्याने हा अल्पवयीन मुलगा विहीरीतून बाहेर आला आणि झाला प्रकार आपल्या घरी सांगितला.
या प्रकाराची खबर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अत्यंत जलद गतीने कारवाई करुन मोतीडोंगर -मडगाव येथील आरोपीला जेरबंद केले. अल्पवयीन मुलाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन त्याचप्रमाणे बाल कायद्याच्या विविध कलमाखाली आरोपी बसवराज कागी याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आणि अटक करण्यात आली.
बुधवारी या आरोपीला मडगावच्या न्यायालयापुढे उभे करण्यात आले तेव्हा न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मायणा -कुडतरी पोलिसांना दिला. आज गुरुवारी या आरोपीला पणजीच्या बाल न्यायालयापुढे उभे करण्यात येणार आहे.
मायणा कुडतरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत वेळीप, हवालदार सोमनाथ नाईक, सचिन नाईक, पोलीस शिपाई रिझवान शेख, चेतन कोली, विशाल धुरी व सिद्धेश पागी यांनी कारवाई केली.