खोल पंचायत ग्रामसभेत ठराव : शॉपिंग कॉम्प्लेक्स व अन्य प्रकल्प उभारण्याचा डाव असल्याचा दावा
वार्ताहर /खोल
खोल पंचायतीची ग्रामसभा नुकतीच पंचायत सभागृहात झाली. सरपंच पूर्णा नायक यांच्या अध्यक्षतेखाली झालेला या ग्रामसभेला उपसरपंच पंढरी प्रभुदेसाई, पंच सिंथिया फर्नांडिस, गुरू गावकर, फोंडू वेळीप, पंचायतीचे सचिव राहिलेले दामोदर काणकोणकर व पंचायतीचा नुकताच ताबा घेतलेल्या सचिव गौरी वेळीप, गटविकास अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी आनंदू देसाई उपस्थित होते.
काब-द-राम किल्ल्याची पर्यटन खात्यातर्फे दुरुस्ती व सौंदर्यीकरणाच्या नावाखाली शॉपिंग कॉम्प्लेक्स व अन्य प्रकल्प उभारण्यात येणार असून गोव्याबाहेरील व्यक्तींना व्यवसाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा डाव सरकारी यंत्रणा व प्रशासन आखत आहे, असा दावा यावेळी करण्यात आला. या किल्ल्यावर स्थानिकांना कोणताही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार नाहीत. पर्यटन खात्याने कामाचा शुभारंभ करण्यापूर्वी दहा दिवस अगोदर या ठिकाणी नेमका कोणता प्रकल्प साकारणार आहे त्याची पूर्वकल्पना यावी यासाठी ग्रामस्थ व पंचायतीसमोर सदर आराखडा ठेवून मान्यता घ्यावी, असा ठराव मांडून तो सर्वसमंतीने मंजूर करण्यात आला.
खोल पंचायतीचे 9 वॉर्ड असून केवळ नुवे वॉर्डावर विकासकामाच्या बाबतीत अन्याय करण्यात आला आहे या आरोपास सरपंच नायक यांनी आक्षेप घेतला. प्रत्येक वॉर्डातील विकासकामांसाठी ग्रामस्थांनी पंच निवडून दिले असून पंचांनी आपल्या भागातील विकासकामांचे प्रस्ताव पंचायत मंडळासमोर सादर करायचे असतात, असे त्यांनी सांगितले. पंचायतीच्या एका भाडेकरूचे सुरुवातीपासूनचे 2 लाख 40 हजार रु. इतके भाडे थकीत असून यासंदर्भात उपजिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या आस्थापनाचा तत्काळ वीजपुरवठा तोडण्यात यावा, असा ठराव संमत करण्यात आला.
शिरोटी विद्यालयाचे छप्पर मोडकळीस
शिरोटी, खोल सरकारी प्राथमिक विद्यालयाचे छप्पर मोडकळीस आले असून शैक्षणिक वर्ष अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. पालकांनी गेल्या पाच वर्षांत अनेकदा विनंती करूनही या जुन्या शाळा इमारतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या इमारतीच्या छपराच्या दुरुस्तीसाठी 37 लाख मंजूर झाल्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी हल्लीच स्पष्ट केले होते. मात्र अजूनही दुरुस्तीचा पत्ता नसून संबंधित खात्यांना पंचायतीने कळवावे, अशी मागणी हरिश्चंद्र खोलकर यांनी केली .
यावर ग्रामस्थांनी अनुपस्थित राहिलेल्या पंचाची खिल्ली उडवली व पुढील वेळी योग्य उमेदवार पंचायतीत पाठवा, असा सूर लावला. या बैठकीत पाण्याचा लोट, हॉटमिक्स डांबरीकरण, पार्किंग सुविधा, गटार उपसा व अन्य समस्यांवर चर्चा करून प्रस्ताव मंजूर करण्यात आले. साळेरीतील जुन्या पायऱयांची दुरुस्ती करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. पंचायतीचे 2022-23 साठीचे अंदाजपत्रक ग्रामसभेत सादर करून मंजूर करण्यात आले. सरपंच नायक यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल पंचायत मंडळाचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. सुनील पागी, हरिश्चंद्र खोलकर, संतोष पागी यांनी या अभिनंदनपर ठरावावर भाष्य केले. जॉन्सन जॅकिस, प्रेडी फर्नांडिस, लक्ष्मीकांत पागी, रॉकी फर्नांडिस, सुनील पागी, संतोष पागी, भूषण खोलकर व अन्य नागरिकांनी चर्चेत भाग घेतला. गोवा सरकारी कर्मचारी संघटनेवर सतत दुसऱयांदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रशांत देविदास यांचे व गोमंतक मराठा समाजाचा उत्कृष्ट नाटय़कलाकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हरिश्चंद्र खोलकर यांचे याप्रसंगी अभिनंदन करण्यात आले.