वार्ताहर/ लोणंद
दिगंबर आगवणे यांनी मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लोणंद पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीमध्ये टॉवेलच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर आगवणे यांना तातडीने लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दुपारी 12 वाजता त्याना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे. या घटनेने जिह्यात खळबळ उडाली. दिगंबर आगवणे यांच्यावर लोणंद ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की लोणंद पोलीस स्टेशनमध्ये नांदल ता फलटण येथील जमीन खरेदीवरुन एकास रिव्हॉल्वर दाखवुन खरेदी केलेल्या जमीन परिसरात कोठे दिसल्यास तसेच माझी कोठे तक्रार केल्यास गोळया घालुन ठार करीन अशी धमकी दिल्याप्रकरणी दिगंबर आगवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाप्रकरणी लोणंद पोलीसानी दिगंबर आगवणे यांना अटक केली होती,अटकेनंतर लोणंद पोलीसानी सदर गुन्हयाच्या अधिक तपासासाठी न्यायालयाकडे दिंगबर आगवणे यांना पोलीस कोठडी मागुन घेतली होती, मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लोणंद पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीमध्ये टॉवेलच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर लोणंद पोलीसानी दिगंबर आगवणे यांना तातडीने लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.मात्र दुपारी 12वाजण्याच्या सुमारास दिगंबर आगवणे यांना पुढील उपचारासाठी शिरवळ मार्गे पुणेला नेहण्यात आले आहे
हॉस्पिटल परिसरात दिगंबर आगवणे यांचे कुटुंबीय,नातेवाईक व मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती. नातेवाईकांनी चांगलाच संताप व्यक्त केला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, या खाजगी हॉस्पिटलला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते