रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने तुफान प्रतिसाद : दौडमध्ये युवकांसोबत महिला-वयोवृद्धांचाही सहभाग
बेळगाव : दुर्गामाता दौडचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने यावर्षी तुफान प्रतिसाद मिळू लागला आहे. गुरुवारी शहराच्या मध्यवर्ती भागात काढण्यात आलेल्या दौडमध्ये युवकांसोबत महिला व वयोवृद्धांचाही सहभाग होता. दौड दरम्यानचे सजीव देखावे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत होते. केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक संदेश देणारे देखावे दौडचे वैशिष्ट्या ठरत आहेत. पाचव्या दिवशीच्या दौडला धर्मवीर संभाजी चौक येथून प्रारंभ झाला. प्रारंभी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. रुद्रकेसरी मठाचे हरिगुरु महाराज यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. प्रेरणा मंत्रानंतर बसवाण गल्ली, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, भातकांडे गल्ली, पांगुळ गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, कामत गल्ली, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, कॉलेज रोडमार्गे संयुक्त महाराष्ट्र चौकात दौडची सांगता झाली. कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी शिवभक्तांशी संवाद साधताना सांगितले की, दुर्गामाता दौड ही शिस्तीसाठी ओळखली जाते. त्यामुळे प्रत्येकाने गीत अथवा घोषणा देताना या कार्याला गालबोट लागू नये याची खबरदारी घ्यावी. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, प्रसाद मेडिकल मॉलचे संचालक सी. के. पाटील उपस्थित होते. खडेबाजार पोलीस स्थानकाचे सीपीआय दिलीप निंबाळकर यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला.
शनिवार दि. 21 रोजीचा दौडचा मार्ग
काँग्रेस रोड येथील शिवतीर्थ येथून दौडला सुरुवात होणार आहे. ग्लोब टॉकीज रोड, इंडिपेंडंट रोड, हायस्ट्रीट, चर्च स्ट्रीट, कल्याणी स्वीट मार्ट रोड, गवळी गल्ली, कोर्ट स्ट्रीट, वेस्ट स्ट्रीट, हायस्ट्रीट, कोंडाप्पा स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, कुंतीमाता मंदिर, फिश मार्केट, तेलगू कॉलनी, के. टी. पुजारी रोड, दुर्गामाता मंदिर, खानापूर रोड, धर्मवीर संभाजी चौक, जत्ती मठ येथे दौडची सांगता होणार आहे.
मंगळवारी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांची उपस्थिती
दिल्ली येथील व्याख्याते, पत्रकार म्हणून ओळख असणारे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ मंगळवार दि. 24 रोजी दौडमध्ये सहभागी होणार असून तरुणाईला मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 7 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे दौडची सांगता झाल्यानंतर पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ शिवभक्तांना मार्गदर्शन करतील. तालुक्यातील सर्व दौडची सांगता सोमवार दि. 23 रोजी केली जाणार असून सर्व धारकरी मंगळवार दि. 24 रोजी बेळगावमध्ये उपस्थित राहतील. यावेळी शहर तसेच परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी केले आहे.