लैंगिक शोषण सिद्ध करण्यासाठी सादर पुरावे अपुरे : दिल्ली पोलीस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या 6 महिला कुस्तीपटूंपैकी 4 कुस्तीपटूंनी दिल्ली पोलिसांना ऑडिओ आणि व्हिज्युअल पुरावे उपलब्ध केले आहेत. बृजभूषण यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकतील अशाप्रकारचे पुरावे सादर करण्यात आले नसल्याचा दावा दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने केला आहे.
2 महिला कुस्तीपटू, एक आंतरराष्ट्रीय पंच आणि राज्यस्तरीय प्रशिक्षकाने कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पोलिसांसमोर जबाब दिला आहे. याच आधारावर पोलीस 15 जून रोजी आरोपपत्र दाखल करणार आहेत. या प्रकरणी नोंदविल्या जाणाऱ्या गुन्ह्यांकरता तज्ञांची मदत घेतली जात आहे. 15 जून रोजी प्रौढ कुस्तीपटूंच्या प्रकरणी दिल्ली पोलीस आरोपपत्र दाखल करणार आहे. तर अल्पवयीन कुस्तीपटूच्या प्रकरणी पोलीस क्लोजर रिपोर्ट सादर करू शकतात. अल्पवयीन कुस्तीपटूने लैंगिक शोषणाचा आरोप यापूर्वीच मागे घेतला आहे.
हरियाणा बंद
खाप पंचायतींनी बुधवारी हरियाणा बंद करण्याची हाक दिली आहे. यादरम्यान राज्यातील रस्ते वाहतूक अन् रेल्वेसेवा बंद ठेवली जाऊ शकते. याचबरोबर दिल्लीसाठीचा फळ-भाज्यांचा पुरवठा रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीन खाप पंचायतींनी या बंदची घोषणा केली होती. त्यांच्याकडून बृजभूषण यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.
4 जुलैला निवडणूक
भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक 4 जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश महेश मित्तल कुमार निवडणूक अधिकारी असणार आहेत. बृजभूषण यांना ही निवडणूक लढविता येणार नाही. ते सलग तीनवेळा अध्यक्ष राहिले असल्याने फेडरेशनच्या नियमांनुसार ते महासंघातील कुठल्याही पदासाठी निवडणूक लढवू शकत नाहीत. हरियाणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष ओ.पी. धनखड हे कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात.