अफगाणच्या रशिद खानची झुंजार लढत, मॅक्सवेल सामनावीर
वृत्तसंस्था/ ऍडलेड
अफगाणिस्तान संघाचा कर्णधार रशिद खानने अखेरच्या टप्प्यात केलेल्या जबरदस्त फटकेबाजीमुळे विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या तोंडचे पाणी पळाले होते. पण रशिद किंचित कमी पडल्याने अफगाणला केवळ 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अर्धशतकी खेळी करणाऱया ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील हा महत्त्वाचा जिंकून ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरी गाठण्याची संधी निर्माण केली आहे. मात्र इंग्लंड व लंका यांच्या सामन्यातील निकालावर त्यांचे भवितव्य अवलंबून राहील. लंका विजयी ठरल्यास ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत खेळेल. इंग्लंड विजयी झाल्यास त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. आणि जर पावसामुळे सामना रद्द झाल्यास इंग्लंडचे एका गुणासह 6 गुण होतील तर ऑस्ट्रेलियाचे 7 गुण असल्याने त्यांना उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळेल. शनिवारी इंग्लंडने लंकेला हरविल्यास त्यांचेही ऑस्ट्रेलियाइतकेच 7 गुण होतील. पण सरस नेट रनरेटमुळे इंग्लंड उपांत्य फेरीत खेळेल.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर निर्धारित 20 षटकांत 8 बाद 168 धावा जमविल्यानंतर ऑस्ट्रेलियाला नेट रनरेटमध्ये इंग्लंडला मागे टाकण्यासाठी अफगाणला 106 धावांपेक्षा कमी धावांत रोखण्याची गरज होती. पण त्यांना तसे करता आले नाही. अफगाणने 20 षटकांत 7 बाद 164 धावा जमविल्या.
ऑस्ट्रेलियाच्या डावात मॅक्सवेलने सर्वाधिक नाबाद 54 धावा जमविल्या. त्याने 32 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार मारले. याशिवाय सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 18 चेंडूत 25, मिशेल मार्शने 30 चेंडूत 45, स्टोइनिसने 21 चेंडूत 25 धावा काढल्या. शेवटच्या पाच षटकांत रशिद खानने जबरदस्त फटकेबाजी करीत ऑस्ट्रेलियाच्या तोंडाला फेस आणत सनसनाटी विजयाची संधी निर्माण केली होती. पण अखेर ते पाच धावांनी कमी पडले. त्यांनी 20 षटकांत 7 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली. रशिद खाने 23 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 48 धावा झोडपल्या. त्याआधी रहमनुल्लाह गुरबाजने उस्मान घनी (2) लवकर बाद झाल्यानंतर इब्राहिम झद्रनसमवेत अफगाणला बऱयापैकी सुरुवात करून दिली. पण गुरबाज 17 चेंडूत 30 धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार, 2 षटकार मारले. इब्राहिन झद्रन व गुलबदिन नईब यांनी 46 चेंडूत 59 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला संघर्ष करण्यास भाग पाडले. मॅक्सवेलच्या अप्रतिम फेकीमुळे गुलबदिन धावचीत झाल्याने ही जोडी फुटली. गुलबदिनने 23 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 39 धावा फटकावल्या तर झद्रन 33 चेंडूत 26 धावा काढून बाद झाला. झाम्पाने त्याला बाद केल्यानंतर नजिबुल्लाह झद्रनलाही झाम्पाने बाद केल्यानंतर अफगाणच्या धावगतीवर परिणाम झाला. शेवटच्या टप्प्यात रशिदने जोरदार टोलेबाजी करीत दार्विश रसूलीसमवेत 28 चेंडूत 45 धावांची भर घातली. शेवटच्या षटकात अफगाणला 22 धावांची गरज असताना रशिदने स्टोईनिसला षटकार व दोन चौकार मारत प्रयत्न केले. पण ते अखेर पुरेसे ठरले नाहीत.
मॅक्सवेलची फटकेबाजी
तत्पूर्वी, ग्रीन (3) लवकर बाद झाल्यानंतर वॉर्नर व मार्श यांनी 26 धावांची भर घातली. पण सहाव्या षटकात वॉर्नर व स्मिथ झटपट बाद झाल्यानंतर पॉवरप्लेमध्ये त्यांची स्थिती 3 बाद 52 अशी झाली. नंतर मार्शलाही मुजीब उर रहमानने बाद केले. 11 व्या षटकात तो बाद झाल्यानंतर मॅक्सवेल व स्टोईनिस (21 चेंडूत 25) यांनी पाचव्या गडय़ासाठी 29 चेंडूत 53 धावा फटकावत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. स्टोईनिसने आपल्या खेळीत फक्त 2 षटकार मारले. जखमी फिंचच्या जागी नेतृत्व सांभाळणारा मॅथ्यू वेडही 6 धावा काढून बाद झाला.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 8 बाद 168 ः वॉर्नर 25 (18 चेंडूत 5 चौकार), मार्श 45 (30 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), स्टोईनिस 25 (21 चेंडूत 2 षटकार), मॅक्सवेल नाबाद 54 (21 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), अवांतर 4. गोलंदाजी ः फारूकी 2-29, नवीन उल हक 3-21, रशिद खान 1-29, मुजीब उर रहमान 1-42.
अफगाण ः 20 षटकांत 7 बाद 164 ः गुरबाज 30 (17 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), इब्राहिम झद्रन 26 (33 चेंडूत 2 चौकार), गुलबदिन नईब 39 (23 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), रसूली 13 चेंडूत 15, रशिद खान नाबाद 48 (23 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), अवांतर 3. गोलंदाजी ः हॅझलवुड 2-33, झाम्पा 2-22, रिचर्डसन 1-48.