डेव्हिड वॉर्नरकडून निवृत्तीचे संकेत
वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ फेब्रुवारी महिन्यात भारताच्या दौऱयावर येणार आहे. या दौऱयामध्ये उभय संघात चार सामन्यांची बोर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 18 जणांचा संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 17 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. या मालिकेतील दुसरा सामना 19 रोजी विशाखापट्टणम येथे तर तिसरा सामना चेन्नईत 22 मार्चला होईल. भारताविरुद्ध होणाऱया चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्टेलियन संघामध्ये नवोदित 22 वषीय टॉड मर्फीचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन यांच्या तंदुरुस्तीनंतरच विचार केला जाईल.
भारतातील खेळपट्टय़ा फिरकीला अनुकूल असल्याने क्रिकेट ऑस्टेलियाने आपल्या संघात 4 फिरकी गोलंदाजांचा समावेश केला आहे. आता या संघामध्ये नवोदित ऑफस्पिनर टॉड मर्फी, ऍस्टोन ऍगेर आणि मिचेल पेप्सन, त्याचप्रमाणे नाथन लेयॉन यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन कसोटी संघातील लान्स मॉरिस हा नवा चेहरा असून तो या मालिकेत कदाचित आपले कसोटी पदार्पण करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी नागपूरमध्ये होणार असून ऑस्ट्रेलियाच्या अंतिम अकरा खेळाडूत कदाचित मॉरिसला संधी मिळू शकेल. ऑस्ट्रेलियाचा हुकमी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा अद्याप दुखापतीतून पूर्ण बरा झालेला नाही. त्यामुळे तो कदाचित या दौऱयातील पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियन संघामध्ये पहिले सहा भक्कम फलंदाज असून त्यांना पीटर हँडस्कॉम्ब आणि मॅट रेनशॉ यांची साथ मिळणार आहे. अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हा या संघातील महत्त्वाचा खेळाडू असून त्याच्यासमोर तंदुरुस्तीची समस्या निर्माण झाली आहे. पहिल्या कसोटीपूर्वी तो पूर्ण तंदुरुस्त राहिला तर त्याला संधी देण्यात येईल.
ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या दौऱयामध्ये एकूण सात सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱयाला 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये प्रारंभ होईल. चार कसोटी आणि तीन वनडे सामने उभय संघात आयोजित केले आहेत. या दौऱयामध्ये पहिली कसोटी 9 फेब्रुवारीला नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर, दुसरी कसोटी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर, तिसरी कसोटी धर्मशाला येथे तर शेवटची कसोटी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
वॉर्नरकडून निवृत्तीचे संकेत
ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. 2023 हे वर्ष आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील अखेरचे राहील, असे त्याने म्हटले आहे. मात्र, फेब्रुवारीमध्ये होणाऱया भारताच्या दौऱयात तो ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळणार आहे.
2024 सालातील आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा विंडीज आणि अमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदाने होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा वॉर्नरने व्यक्त केली. पण 2023 चा क्रिकेट हंगाम हा आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा असण्याची शक्मयता वॉर्नरने वर्तविली आहे. आपल्या तेरा वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या यशामध्ये वॉर्नरचा वाटा महत्त्वाचा आहे. 2009 पासून वॉर्नरने क्रिकेटच्या सर्व प्रकारात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व सातत्याने केले आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट क्षेत्रात लाभलेला हा असामान्य क्रिकेटपटू आहे.
डेव्हिड वॉर्नरने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत आतापर्यंत 101 कसोटी सामन्यात 46.20 धावांच्या सरासरीने 8 हजार 132 धावा जमविल्या असून त्यात 25 शतके आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये नाबाद 335 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
वॉर्नरने 141 वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना 45.16 धावांच्या सरासरीने 6007 धावा जमविल्या असून त्यामध्ये 19 शतके आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. 179 ही वॉर्नरची वनडेमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. वॉर्नरने टी-20 प्रकारातील 99 सामन्यात 32.88 धावांच्या सरासरीने 2 हजार 894 धावा जमविल्या असून त्यामध्ये 1 शतक आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 प्रकारात शंभर धावांची खेळी ही वॉर्नरची सर्वोत्तम ठरली. 2015 साली आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद त्याचप्रमाणे 2021 च्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱया ऑस्ट्रेलियन संघामध्ये वॉर्नरचा समावेश होता.
ऑस्ट्रेलियन कसोटी संघ- पॅट कमिन्स (कर्णधार), ऍस्टोन ऍगेर, स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरे, कॅमेरून ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, टेविस हेड, उस्मान ख्वाजा, एम. लाबुशेन, नाथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), स्टार्क, स्वेपसन आणि डेव्हिड वॉर्नर.