वृत्तसंस्था/ केर्न्स
ऑस्ट्रेलियन क्रिकेट वनडे संघाचा कर्णधार ऍरॉन फिंचने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. सध्या न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी होत असून फिंचचा हा शेवटचा वनडे सामना असेल.
35 वर्षीय फिंचला अलीकडेच फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडावे लागले आहे. जूनमध्ये लंकेविरुद्ध वनडे सामन्यात त्याने 62 धावा जमविल्यानंतर त्यानंतर झालेल्या तीन सामन्यात त्याला आपले खातेही उघडता आले नाही. दरम्यान, वनडे क्रिकेटमधून आपण निवृत्त होत असल्याचे फिंचने सूचित केले आहे. मात्र ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघाचे नेतृत्त्व फिंचकडेच राहील, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे सांगण्यात आले आहे.
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा भरवली जाणार असून ऍरॉन फिंचकडे संघाचे नेतृत्व असेल. फिंचने 145 वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले असून त्यापैकी 54 सामन्यात तो कर्णधार होता. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 40 धावांच्या सरासरीने 5,401 धावा जमविल्या असून त्यामध्ये 17 शतकांचा समावेश आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत फिंचने आपला फॉर्म गमविला आहे. त्याला अधिक धावा जमविता आल्या नाहीत. न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली असून रविवारी या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळविला जाणार आहे.