दुसरी कसोटी चौथा दिवस : दक्षिण आफ्रिकेवर डावाने दणदणीत विजय, डेव्हिड वॉर्नर सामनावीर, लियॉनचे 3 बळी, बवुमाचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था /मेलबर्न
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. येथे गुरुवारी झालेल्या दुसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा चौथ्या दिवशीच एक डाव आणि 182 धावांनी दणदणीत पराभव केला. आपल्या शतकी कसोटीत द्विशतक झळकवणाऱया डेव्हिड वॉर्नर ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा संघ आता ही मालिका एकतर्फी जिंकण्यासाठी आतुरलेला आहे. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियन संघ फेब्रुवारी महिन्यात भारताच्या दौऱयावर आपले लक्ष अधिक केंद्रित करेल.
या दुसऱया कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला 189 धावावर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 8 बाद 575 धावांवर घोषित करून 386 धावांची भक्कम आघाडी मिळवली. दक्षिण आफ्रिकेने 1 बाद 15 या धावसंख्येवरून चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 68.5 षटकात 204 धावात आटोपला. बवुमाने 144 चेंडूत 6 चौकारासह 65, इर्विने 1 चौकारासह 21, डी. ब्रुइनने 2 चौकारासह 28, व्हेरेनीने 5 चौकारासह 33, केशव महाराजने 2 चौकारासह 13 आणि एन्गिडीने 21 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 19 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने आपले तीन फलंदाज गमविले. झोंडो आणि केशव महाराज हे धावचित झाले. बवुमा आणि व्हेरेनी यांनी चौथ्या गडय़ासाठी 63 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियातर्फे लियॉनने 58 धावात 3 तर बोलँडने 49 धावात 2 तसेच स्टार्क, कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या दुसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियातर्फे डेव्हिड वॉर्नरने शानदार द्विशतक तर यष्टीरक्षक आणि फलंदाज ऍलेक्स कॅरेने शानदार शतक नोंदवले. त्याचप्रमाणे स्टीव्ह स्मिथ आणि हेड यांची अर्धशतके महत्त्वाची ठरली.
2005-2006 नंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. द.आफ्रिकेने 2008-09, 2012-13 व 2016-17 या मालिका जिंकल्या होत्या. स्टार्क जखमी असल्याने तो तिसऱया कसोटीत खेळू शकणार नाही. भारताविरुद्ध होणाऱया मालिकेसाठी उपलब्ध होण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे. तिसरी कसोटी 4 जानेवारीपासून सिडनीमध्ये होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका प. डाव 189, ऑस्ट्रेलिया प. डाव 8 बाद 575 डाव घोषित, दक्षिण आफ्रिका दु. डाव 68.5 षटकात सर्वबाद 204 (बवुमा 65, डी. ब्रुइन 28, इर्वि 21, व्हेरेनी 33, केशव महाराज 13, एन्गिडी 19, लियॉन 3-58, बोलँड 2-49, स्टार्क 1-62, कमिन्स 1-20, स्मिथ 1-9).