पहिला डाव 284 धावांमध्ये खुर्दा, दुसऱया डावातील 3 बाद 125 धावांसह भारताकडे 257 धावांची आघाडी
वृत्तसंस्था/ बर्मिंगहम
जॉनी बेअरस्टोने 14 चौकार, 2 षटकारांसह 106 धावांची आक्रमक शतकी खेळी साकारल्यानंतरही भारताने येथील पाचव्या व शेवटच्या कसोटी सामन्यात सिराज-बुमराहच्या एकत्रित 7 बळींच्या जोरावर इंग्लंडचा पहिला डाव 61.3 षटकात सर्वबाद 284 धावांमध्ये गुंडाळला आणि दुसऱया डावात 3 बाद 125 धावांसह 257 धावांची मजबूत आघाडी घेतली. रविवारी तिसऱया दिवसअखेर चेतेश्वर पुजारा 139 चेंडूत 5 चौकारांसह 50 तर रिषभ पंत 46 चेंडूत 4 चौकारांसह 30 धावांवर नाबाद राहिले.
तत्पूर्वी, भारताच्या पहिल्या डावातील सर्वबाद 416 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडला पहिल्या डावात सर्वबाद 284 धावांवर समाधान मानावे लागले.
बुमराह, सिराज यांनी वरचष्मा गाजवला असला तरी बेअरस्टोने शतक झळकावताना केलेली धुलाई लक्षवेधी ठरली. बेअरस्टोसाठी 2022 मधील हे पाचवे शतक ठरले. सध्या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीतही बेअरस्टोच आघाडीवर आहे. मात्र, शतक झळकावल्यानंतर काहीच कालावधीत सिराजने बेअरस्टोचा बळी घेतला आणि त्यानंतर इंग्लिश फलंदाजीचे शेपूट गुंडाळण्यासाठी भारताला फारसा अवधी लागला नाही.
इंग्लिश डावात बेअरस्टो सर्वाधिक यशस्वी फलंदाज ठरला. त्याने 140 चेंडूत 106 धावांची खेळी साकारताना कर्णधार बेन स्टोक्ससमवेत 66 तर सॅम बिलिंग्जसमवेत 92 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. स्टोक्सने 25 तर बिलिंग्जने 36 धावांचे योगदान दिले. तत्पूर्वी, इंग्लंडने 6 बाद 200 धावा जमवल्या असताना पावसाचा व्यत्यय आला आणि निर्धारित वेळेपेक्षा लवकर उपाहारासाठी ब्रेक घेण्यात आला.
रविवारी या सामन्याच्या तिसऱया दिवशी इंग्लंडने 5 बाद 84 या मागील धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केली, त्यावेळी बेअरस्टो 12 तर स्टोक्स शून्यावर खेळत होते. या जोडीने नंतर भारतीय गोलंदाजांवर दडपण आणण्यास सुरुवात केली होती. बेअरस्टोने डीप मिडविकेट व डीप मिडऑन क्षेत्रातील गॅप शोधत काही चौकार फटकावले तर सॅम बिलिंग्जने फाईन लेग ते थर्ड मॅन एरियात चौकार वसूल केले. इंग्लंडचा पहिला डाव केवळ 61.3 षटकांपुरता राहिला असला तरी त्यांनी 4.61 चा रनरेट नोंदवला.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव ः सर्वबाद 416.
इंग्लंड पहिला डाव ः 61.3 षटकात सर्वबाद 284 (जॉनी बेअरस्टो 140 चेंडूत 14 चौकार, 2 षटकारांसह 106, सॅम बिलिंग्ज 57 चेंडूत 4 चौकारांसह 36, बेन स्टोक्स 36 चेंडूत 3 चौकारांसह 25, मॅथ्यू पॉट्स 18 चेंडूत 19. अवांतर 35. सिराज 11.3 षटकात 4-66, बुमराह 19 षटकात 3-68, शमी 22 षटकात 2-78, शार्दुल 1-48).
भारत दुसरा डाव ः 45 षटकात 3 बाद 125 (चेतेश्वर पुजारा 139 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 50, रिषभ पंत नाबाद 30, विराट 20, विहारी 11, शुभमन 4. अँडरसन, ब्रॉड, स्टोक्स प्रत्येकी 1 बळी).
विराटच्या ‘त्या’ स्लेजिंगनंतर बेअरस्टोमध्ये जणू पंत ‘संचारला’!
कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावणाऱया जॉनी बेअरस्टोने तिसऱया दिवशी देखील सावध, बचावात्मक पवित्र्यावरच पूर्णपणे भर दिला होता. आक्रमक फटके मारण्याऐवजी खराब चेंडूंची प्रतीक्षा करण्यावर त्याने लक्ष केंद्रित केले होते. पण, विराट कोहलीशी स्लेजिंगचे निमित्त झाले आणि यामुळे संतापलेल्या बेअरस्टोने नंतर अचानक अतिशय आक्रमक फटकेबाजी करत सर्व वातावरणच बदलून टाकले.
विराट कोहलीशी बराच वेळ शाब्दिक चकमक झडली, त्यावेळी बेअरस्टो 61 चेंडूत केवळ 13 धावा जमवू शकला होता. त्यानंतर मात्र त्याने अवघ्या 79 चेंडूतच 93 धावांची आतषबाजी केली आणि जणू विराटच्या त्या स्लेजिंगचा हिशेब अगदी व्याजासह चुकता केला!
पुढे, शमीच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लीपमध्ये कोहलीनेच बेअरस्टोचा अप्रतिम झेल घेत त्याचा थाटात आनंद साजरा केला. पण, तोवर बेअरस्टोने पहिल्या डावाअखेर पिछाडी बऱयाच प्रमाणात कमी केली होती.
सेहवागची विराटवर टीका, बेअरस्टोला का छेडले?
विराटच्या स्लेजिंगनंतर जवळपास प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडत बेअरस्टोने झंझावाती शतक झळकावल्यानंतर माजी सलामीवीर सेहवागने सोशल मीडियावर विराटला ट्रोल करण्यात कसर सोडली नाही. स्लेजिंगपूर्वी बेअरस्टोचा स्ट्राईकरेट फक्त 21 होता. तो स्लेजिंगनंतर 150 पर्यंत पोहोचला, याचा सेहवागने उल्लेख केला. आपल्या ट्वीटमध्ये सेहवाग म्हणाला, ‘पुजारा की तरह खेल रहे थे बेअरस्टो, कोहलीने पंत बनवा दिया बेवजह स्लेज कर के’!
रोहित शर्माची कोरोनावर मात, आयसोलेशनमधून बाहेर
बर्मिंगहम ः भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने कोरोनावर मात केली असून शनिवारी तो आयसोलेशनमधून बाहेर आला आहे. आता इंग्लंडविरुद्ध साऊदम्प्टन येथे होणाऱया मर्यादित षटकातील पहिल्या सामन्यात तो उपलब्ध होऊ शकेल. ही लढत दि. 7 जुलै रोजी खेळवली जाणार आहे.
35 वर्षीय रोहित शर्माला यापूर्वी इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यात खेळता आले नाही. लिसेस्टरविरुद्ध चार दिवसीय सराव सामन्यादरम्यान तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. मर्यादित षटकांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित आता खेळणार आहे. विराट कोहली, बुमराह, रिषभ पंत व जडेजा मात्र दुसऱया सामन्यापासून उपलब्ध असतील.