शाहूपुरी पोलिसांची कारवाई : गॅँगचा म्होरक्या रेकॉर्डवरील गुन्हेगार
सातारा: येथील कोटेश्वर मैदान परिसरात महाविद्यालयीन युवकास कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत लुटणाऱ्या बकासूर गॅँगच्या मुसक्या आवळण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे. या टोळीचा म्होरक्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून गेल्या दोन महिन्यापासून कॉलेजच्या युवकांना मारहाण करून हत्याराचा धाक दाखवून पैसे मागणे, जवळील साहित्य काढून घेणे असे प्रकार गॅँगचे सदस्य करत होते. या युवकाने शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच 6 जणांना जेरबंद करण्यात आलेले आहे. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोटेश्वर मैदान परिसरात शनिवारी दुपारी एक अल्पवयीन युवक मित्रासमवेत आला होता. याठिकाणी मित्रासमवेत तो चर्चा करत असतानाच त्याठिकाणी बकासूर गँगचा म्होरक्या यश नरेश जांभळे (वय 19, शाहुपूरी, सातारा), स्मितेश ऊर्फ सागर दिलीप उंबरकर (वय 23, रा. सैदापुर), सिध्देश उर्फ पियुश सुनिल घाडगे (वय 19, रा. दिव्यनगरी, कोंडवे), राहुल संपत बर्गे (वय 19, रा. दिव्यनगरी, कोंडवे) व दोन अल्पवयीन युवक आले. त्यांनी मित्रासमवेत थांबलेल्या त्या अल्पवयीन महाविद्यालयीन युवकास बोलावून घेतले. त्याला कोयत्याचा धाक दाखवत घोडके व इतरांनी पैसे मागितले. पैसे नसल्याचे सांगताच जांभळे, घोडके व इतरांनी त्याला मारहाण केली. मारहाण करतानाच त्यांनी त्या युवकाचे पैशाचे पाकीट, तसेच मनगटी घडय़ाळ हिसकावले. याचदरम्यान त्याठिकाणी घोडके, जांभळेचे इतर साथीदार आले. त्यांनी महाविद्यालयीन युवकास मारहाण करत त्याच्या हातातील अंगठी, तसेच कानात असणारी सोन्याची बाळी ओढण्याचा प्रयत्न केला. सुरू असणारा गोंधळ पाहून त्या महाविद्यालयीन युवकाचे इतर मित्र आले. त्यांनाही घोडके, जांभळे व इतरांनी मारहाण करत कोयत्याने धाक दाखवला.
हेही वाचा- विचारांच्या ताकदीने लढतो तोच संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता-शशिकांत शिंदे
याची माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. पोलीस आल्याचे पाहून काहीजणांनी त्याठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी पळणाऱया काही युवकांना पाठलाग करून पकडले. याची फिर्याद त्या युवकाने नोंदवली असून, यात त्याने घोडके, जांभळे व इतरांनी 440 रुपयांची रोकड असणारे पाकीट आणि मनगटी घडय़ाळ हिसकावून नेल्याचे नमूद केले आहे. यानुसार बकासूर गँगवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, पोलीस उपनिरीक्षक बशीर मुल्ला, पोलीस हेड कॉन्टेबल हसन तडवी, लैलेश फडतरे, पोलीस नाईक अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पोलीस कॉन्टेबल सचिन पवार, स्वप्निल सावंत, समीर वाघमळे, सतिश बाबर, सुनिल भोसले यांनी केली आहे.