प्रतिनिधी,विटा
Sangli News : विटा येथील बळवंत महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन समिती (नॅक) यांच्याकडून चौथ्या मूल्यांकनामध्ये ‘ए++’ मानांकन दर्जा प्राप्त झाला.विशेष म्हणजे बळवंत कॉलेज यावर्षी हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.या पार्श्वभूमीवर महाविद्यालयास मिळालेल्या यशानंतर परिसरात गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
गत महिन्यात १७ व १८ जुलै २०२३ रोजी राष्ट्रीय मूल्यांकन समिती (नॅक)ने महाविद्यालयाला भेट दिली होती.त्यावेळी महाविद्यालयातील प्रत्येक घटकाने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. महाविद्यालयातील प्रत्येक घटकाचे योगदान मोलाचे ठरले.१९६३ साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या वडिलांच्या नावाने स्थापन झालेले बळवंत कॉलेज शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील,सांगली जिल्ह्यातील तसेच खानापूर तालुक्यातील एक नामांकित महाविद्यालय आहे.महाविद्यालयात कनिष्ठ,वरिष्ठ पदव्युत्तर आणि व्यावसायिक स्तरावर कला, वाणिज्य, विज्ञान शाखेत आज जवळपास पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.विटा आणि परिसरातील जवळपास २५-३० गावातील विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणाची सोय बळवंत कॉलेजने केली आहे.महाविद्यालयाचे हजारो माजी विद्यार्थी आज विविध मानाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.
महाविद्यालयात १११ तज्ज्ञ प्राध्यापक,४४ प्रशासकीय सेवक कार्यरत आहेत. २०२१-२२ सालचा रयत शिक्षण संस्था,सातारा यांच्याकडून दिला जाणारा आदर्श महाविद्यालय पुरस्कार बळवंत कॉलेजला मिळाला आहे.बळवंत कॉलेज यावर्षी हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.महाविद्यालयास मिळालेल्या या सन्मानाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार,माजी चेअरमन डॉ.अनिल पाटील,माजी सचिव डॉ.विठ्ठल शिवणकर,विद्यमान चेअरमन चंद्रकांत दळवी,सचिव विकास देशमुख,सहसचिव डॉ.ज्ञानेश्वर म्हस्के ऑडिटर डॉ.शिवलिंग मेनकुदळे,शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.डी.टी.शिर्के तसेच माधवराव मोहिते यांनी बळवंत कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या प्रमुख डॉ.श्रेया पाटील तसेच सर्व सेवकांचे कौतुक केले.