फेसबुक-व्हॉट्सॲपवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून फसवणूक
प्रतिनिधी / बेळगाव
सायबर गुन्हेगारीचे प्रकार वाढीस लागले आहेत. पोलीस निरीक्षकाच्या नावे फेसबुक अकाऊंट उघडून फेसबुकमधील त्यांच्या मित्रांची फसवणूक करण्यात येत होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला असून यासंबंधी मुरगोड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे.
मुरगोडचे पोलीस निरीक्षक मौनेश्वर माली-पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी मौनेश्वर यांचे गणवेशातील फोटोचा वापर केला आहे. केवळ फेसबुकवर खोटे अकाऊंट उघडण्यात आले नाही तर व्हॉट्सॲप प्रोफाईललाही त्यांच्या फोटोचा वापर झाला आहे.
मौनेश्वर हे मुरगोड पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक आहेत. दोन दिवसांपूर्वीच अन्यत्र त्यांची बदली झाली आहे. भामट्यांनी त्यांच्या फोटोचा वापर करून बोगस फेसबुक अकाऊंट उघडले आहे. त्यांच्या मित्रांना फ्रेंडरिक्वेस्ट पाठवून आपण सीआयएसएफचे अधिकारी आहोत, आपली बदली झाली आहे. कमी किमतीत फर्निचर विकायचे आहे, असे सांगत फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला आहे.
+918926319454 क्रमांकाच्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप प्रोफाईलसाठीही पोलीस निरीक्षकांच्या फोटोचा वापर करण्यात आला आहे. त्यानंतर नवीनसिंग तोमर या नावाने आणखी एक बोगस अकाऊंट उघडून +916371126538 या व्हॉट्सॲपवरून सीआयएसएफचे अधिकारी असल्याचे सांगत फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मौनेश्वर यांचा फोटो पाहून त्यांच्या काही मित्रांनी भामट्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याचीही शक्यता आहे. परमेश्वर नामक एका मित्राने मौनेश्वर यांच्याशी संपर्क साधून फेसबुक व व्हॉट्सॲपवर चाललेल्या प्रकारासंबंधी माहिती दिल्यानंतर भामट्यांचा हा डाव उघडकीस आला आहे. त्यानंतर त्यांनी मुरगोड पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून भादंवि 420 व आयटी ॲक्टनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी अशा सायबर गुन्हेगारांच्या कारवायांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी केले आहे.