वेर्ला काणका ग्रामसभेत नागरिकांची मागणी : शांतता भंग न नको, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
म्हापसा : काणका डिमेलवाडा वॉर्ड क्र. 2 मध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली बेकायदेशीर प्रकार सुरू असून गावाबाहेरील लोक खासकरून बिगरगोमंतकीय शेकडोच्या संख्येने येथे जमा होतात. अब्दूल खालिद करोल आणि सहकारी या ठिकाणी दर शुक्रवार व इतर दिवशीही लाऊडस्पीकरने सहकाऱ्यांना संबोधित करतात हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. या प्रकारामुळे गावातील शांतता भंग होते. त्यामुळे या प्रकारावर कायदशीर कारवाई व त्वरित बंदी घालण्याची मागणी वेर्ला काणका गावातील नागरिकांनी केली. सरपंच आरती च्यारी यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या ग्रामसभेला उपसरपंच दिगंबर काळंगुटकर, पंच मोहन दाभाळे, वासुदेव कोरगांवकर, अशोक आर्लेकर, विश्वास आर्लेकर, सचिव रघुवीर बागकर, क्लार्क कल्पना शिरोडकर आदी उपस्थित होते.
लेखी निवेदन ग्रामसभेत सादर
काणका डिमेलवाडा गावातील नागरिकांनी याबाबत लेखी निवेदन सरपंचाना सहीनिशी दिले आहे. या जागी नेमके काय चालले हे कुणालाच माहीत नाही. स्थानिक पंचायतीची परवानगी नसताना येथे लोक कसे काय जमा होतात असा प्रश्न नागरिकानी उपस्थित केला. या प्रकारामुळे भविष्यात गावात कायदा सुव्यवस्था बिघडू शकते अशी माहिती लवू कोनाडकर यांनी दिली. या कृतीला प्रशांत रेडकर, हिंदू जनजागृती तथा मंदिर समितीचे अध्यक्ष जयेश थळी यांनीही आक्षेप घेत यावर कायदेशीर कारवाई तसेच बंदी घालण्याचा ठराव पंचायतीने घ्यावा अशी मागणी केली.
जाब विचारल्यास उडवाउडवी उत्तरे : सुदेश किनळकर
नागरिक सुदेश किनळेकर म्हणाले की, गावाबाहेरील लोक गावात दुपारी तसेच रात्री उशीरा जमा होतात. ट्रिप्पलसिट बसवून वाहने वेगाने हाकतात. त्यांच्याकडे ओळखपत्र, गाडीचा परवाना नसतो. उलट त्याना जाब विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात. त्याच्याकडे मेळावा भरण्याचा परवाना नसताना येथे गैरकृत्ये होत असल्याचा आरोप किनळेकर यांनी केला.
पंचायतीने वेळीच आवर घालावा : जयेश थळी
मंदिर समितीचे अध्यक्ष जयेश थळी म्हणाले की, पंचायतीने हा प्रकार गांभिर्याने घ्यायला पाहिजे. संबंधितांना नोटीस बजावून त्याना जाब विचारावा सध्या राज्यातील स्थिती संवेदनशील असून अशा घटनामुळे गावात शांतता भंग होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते. यामुळे पंचायतीने यावर वेळीच आवर घालावा अशी मागणी थळी यांनी केली.
भाडेकरू, दुकानांचा तपशील पंचायतीला द्या
काणका गावात विविध घरात भाडेकरू रहातात. तसेच गावात अनेक व्यावसायिक दुकाने आहेत मात्र त्यांचा तपशील पंचायतीकडे नाही. यासर्वांची नोंदणी करण्यासाठी पंचायत लवकरच सर्वांना नोटीस बजावेल. त्याला महिन्याभराचा अवधी देण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी पंच वासूदेव कोरगांवकर यांनी दिली.
भटकी गुरांना आवर घाला : अनिल केरकर
कणका बांध येथील नागरिक शैलेश कोरगावकर यांनी गावात अनेकजण भाडेकरू रहातात त्यांचे सीफॉर्म आदी ओळख पत्राची पडताळणी पंचायतीने करून घ्यावी असे सांगितले. गावात भटकी गुरे वाढली असून शेतात जाऊन ती नाशाडी करतात त्यावर आवर घालावा अशी मागणी अनिल केरकर यांनी केली.
नवीन सभागृह बांधण्यास 10 लाखांची देणगी जाहीर
काणका गावात पंचायत सभागृह बांधावे सध्या या ठिकाणी जागा अपुरी पडते याची पंचायतीने दखल घ्यावी अशी मागणी परेश पालयेकर यांनी केली. याची दखल घेत वेर्ला काणका गावाचे भाटकार यांनी नवीन सभागृह बांधण्यासाठी आपण स्वत: 10 लाख रूपये देणगी पंचायतीला देत असल्याचे जाहीर केल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून भाटकाराचे अभिनंदन केले. सचिव रघुवीर बागकर यांनी मागील इतिवृत्तांत वाचून दाखवून त्यास मान्यता मिळविली. सरपंच आरती च्यारी यांनी आपण सरपंच होऊन हि पहिलीच ग्रामसभा असल्याचे सांगून सर्व नागरिकांचे स्वागत केले व दिवंगत नागरिकांना स्तब्धता पाठवण्यात आली. उपसरपंच दिगंबर कळंगुटकर यांनी आभार मानले.