शकिब अल हसनला दुहेरी मुकुट : अफगाण सहा गड्यांनी पराभूत
वृत्तसंस्था/ सिलेथ
शकिब अल हसनच्या कुशल नेतृत्वाखाली यजमान बांगलादेशने अफगाण विरुद्धची दोन सामन्यांची टी-20 मालिका 2-0 अशी एकतर्फी जिंकली. या मालिकेतील रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने अफगाणवर डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे 6 गड्यांनी विजय मिळविला. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनला ‘सामनावीर’ आणि ‘मालिकावीर’ असा दुहेरी मुकुट मिळाला.
या दुसऱ्या सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने निर्धारित खेळ तासभर उशिराच सुरु झाल्याने पंचांनी हा सामना प्रत्येकी 17 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला. शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून अफगाणला प्रथम फलंदाजी दिली. अफगाणने 17 षटकात 7 बाद 116 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 16.1 षटकात 4 बाद 119 धावा जमवित हा सामना 6 गड्यांनी जिंकला.
दिवस-रात्रीच्या खेळविण्यात आलेल्या या सामन्यात अफगाणच्या डावात इब्राहिम झद्रानने 27 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 22, मोहम्मद नबीने 22 चेंडूत 1 चौकारासह 16, उमरझाईने 21 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 25, करीम जनातने 15 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 20, कर्णधार राशिद खानने 1 षटकारासह नाबाद 6 धावा जमविल्या. अफगाणच्या डावात 5 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. पॉवर प्ले दरम्यान अफगाणने 34 धावा जमविताना 2 गडी गमावले. अफगाणचे अर्धशतक 56 चेंडूत तर शतक 83 चेंडूत नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे तस्किन अहमदने 33 धावात 3, मुस्तफिझूर रेहमानने 30 धावात 2 तर शकिब अल हसनने 15 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावात सलामीच्या लिटन दासने 36 चेंडूत 6 चौकारांसह 35, अफिफ हुसेनने 20 चेंडूत 2 चौकारांसह 24, नजमुल हुसेन शांतोने 4, हृदोयने 17 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 19, कर्णधार शकिब अल हसनने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 18 तर शमीम हुसेनने 1 चौकारासह नाबाद 7 धावा जमवल्या. बांगलादेशच्या डावात 4 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे मुजीब उर रहमानने 28 धावात 2 तर उमरझाईने 17 धावात 2 गडी बाद केले. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने शेवटच्या षटकामध्ये थरारक विजय मिळविताना अफगाणचा 2 गड्यांनी पराभव केला होता. या सामन्यात अफगाणच्या करीम जनातने डावातील शेवटच्या षटकात हॅट्ट्रीक नोंदविली होती. बांगलादेशने पॉवर प्ले दरम्यान 50 धावा जमवताना एकही गडी गमावला नाही. बांगलादेशचे अर्धशतक 30 चेंडूत तर शतक 85 चेंडूत नोंदविले गेले. या दौऱ्यामध्ये अफगाणने बांगलादेश विरुद्धची एकमेव कसोटी विक्रमी 546 धावांच्या फरकाने गमवली होती. तर अफगाणने 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती.
संक्षिप्त धावफलक : अफगाण 17 षटकात 7 बाद 116 (गुरबाज 8, झेझाई 4, आय. झेद्रान 22, नबी 16, एन. झेद्रान 5, उमराझाई 25, करीम जनात 20, राशिद खान नाबाद 6, अवांतर 9, टी. अहमद 3-33, एम. रेहमान 2-30, शकिब अल हसन 2-15), बांगलादेश 16.1 षटकात 4 बाद 119 (लिटॉन दास 35, अफिफ हुसेन 24, नजमुल हुसेन 4, हृदोय 19, शकिब अल हसन नाबाद 18, शमिम हुसेन नाबाद 7, अवांतर 12, मुजीब उर रहमान 2-28, उमरझाइ 2-17).