एअर इंडिया दर महिन्याला 500 उमेदवारांना घेणार : झीस करणार 5 हजार जणांची भरती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी हवाई क्षेत्रातील कंपनी एअर इंडिया आगामी काळात लाखो जणांना रोजगार देण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. याचसोबत चष्म्याच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या झीस या कंपनीकडूनही भारतात उमेदवारांची मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एअर इंडिया येणाऱ्या काळात दर महिन्याला 500 जणांना क्रू सदस्य म्हणून नोकरी उपलब्ध करुन देणार असणार असल्याचे समजते. क्रू रोस्टरिंग प्रकल्पाची लवकरच कंपनी सुरुवात करणार आहे. टाटा समूहाची मालकी असणाऱ्या एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, कंपनीत जास्तीत जास्त क्रू सदस्य असण्याची गरज लक्षात घेऊन आगामी काळात ती पूर्ण केली जाईल. कर्मचारी संख्या वाढवल्याने कामाचा वाढणारा ताण काहीसा हलका होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात दर महिन्याला अंदाजे 500 पेक्षा जास्त नव्या क्रू सदस्यांना नोकरीत सामावून घेतलं जाणार आहे. त्यांना योग्य ते प्रशिक्षणही दिले जाणार आहे. चालक दलातील सदस्यांकरीता कंपनीने एक सॉफ्टवेअर विकसित केले असून त्याचा वापर केला जाणार आहे.
झीस करणार 5 हजार जणांची भरती
भरतीसंबंधात आणखी एक गुड न्यूज दिलीय ती चष्म्यांची लेन्स बनवणाऱ्या झीस या कंपनीने. आगामी काळात कंपनी भारतात आपल्या व्यवसायाअंतर्गत 5 हजार जणांना नोकरीत सामावून घेणार असल्याचे कळते.
कुठे होणार कारखाना?
25 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या कार्ल झीस इंडिया कंपनीला 2027 पर्यंत व्यवसायाची उलाढाल 5 हजार कोटी रुपयांवर न्यायची आहे. बेंगळूर विमानतळाजवळ कंपनीने 34 एकर जमीन खरेदी केल्याचे कळते.