वृत्तसंस्था/ चेतोग्राम
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील येथे सोमवारी खेळवण्यात आलेल्या दिवस-रात्रीच्या शेवटच्या सामन्यात यजमान बांगलादेशने इंग्लंडचा 50 धावांनी पराभव केला. दरम्यान इंग्लंडने या मालिकेतील पहिले सलग दोन सामने जिंकून विजेतेपद मिळवले आहे. इंग्लंडच्या आदिल रशीदला मालिकावीर तर बांगलादेशच्या शकीब अल हसनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. इंग्लंडने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.
या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा डाव 48.5 षटकात 246 धावात आटोपला. त्यानंतर शकीब अल हसनच्या फिरकीसमोर इंग्लंडचा डाव 43.1 षटकात 196 धावात संपुष्टात आल्याने त्यांना हा सामना 50 धावांनी गमवावा लागला.
बांगलादेशच्या डावामध्ये नजमुल हुसेन शांतो, मुशफिकर रहीम आणि शकीब अल हसन यांनी शानदार अर्धशतके झळकवली. नजमुल हुसेनने 71 चेंडूत 5 चौकारासह 53, मुशफिकर रहिमने 93 चेंडूत 6 चौकारांसह 70, शकीब अल हसनने 71 चेंडूत 7 चौकारांसह 75 धावा झळकवल्या. कर्णधार तमीम इक्बालने 1 चौकारासह 11 तर अफीफ हुसेनने 2 चौकारासह 15 धावा केल्या. लिटॉन दासला खाते उघडता आले नाही. इंग्लंडच्या सॅम करनने कर्णधार तमीम इक्बाल आणि लिटॉन दास यांना बाद करून बांगलादेशवर दडपण आणले. 3 षटकात बांगलादेशची स्थिती 2 बाद 17 अशी होती. नजमुल हुसेन आणि मुशफिकर रहीम यांनी तिसऱ्या गड्यासाठी 98 धावांची भागीदारी केली. नजमूल हुसेन एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. आदिल रशीदने रहिमचा त्रिफळा उडवला. रशीदने बांगलादेशला आणखी एक धक्का देताना मेहमुदुल्लाला त्रिफळाचित केले. बांगलादेशची स्थिती यावेळी 5 बाद 163 अशी होती. शकीब अल हसन आणि आफिफ हुसेन यांनी सहाव्या गड्यासाठी 49 धावांची भर घातली. आर्चरने बांगलादेशचे तळाचे फलंदाज लवकर गुंडाळले. आर्चरच्या गोलंदाजीवर शकीब अल हसन नवव्या गड्याच्या रुपात झेलबाद झाला. बांगलादेशच्या डावात 1 षटकार आणि 22 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडतर्फे आर्चरने 3 तर सॅम करन आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन तसेच ओक्स व रेहान अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावाला रॉय आणि सॉल्ट यांनी समाधानकारक सुरुवात करून दिली. या जोडीने 9 षटकात 54 धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर इंग्लंडचा डाव कोलमडला. शकीब अल हसनने सॉल्टला झेलबाद केले. त्याने 7 चौकारांसह 35 धावा जमवल्या. इबादोत हुसेनने डेव्हिड मलानला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. शकीब अल हसनच्या फिरकी चेंडूवर रॉयचा त्रिफळा उडाला त्याने 3 चौकारांसह 19 धावा जमवल्या. जेम्स व्हिन्सेने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 38, सॅम करनने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 23, कर्णधार बटलरने 24 चेंडूत 26, ख्रिस वोक्सने 46 चेंडूत 2 चौकारांसह 34 धावा जमवल्या. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. 43.1 षटकात इंग्लंडचा डाव 196 धावात आटोपला. इंग्लंडच्या डावात 2 षटकार आणि 17 चौकार नोंदवले गेले. बांगलादेशतर्फे शकीब अल हसनने 35 धावात 4, टी. इस्लामने 52 धावात 2, इबादोत हुसेनने 38 धावात 2, मुशफिकर रेहमान आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक बांगलादेश 48.5 षटकात सर्वबाद 246 (शकीब अल हसन 75, मुशफिकर रहीम 70, नजमूल हुसेन शांतो 53, अफीफ हुसेन 15, तमीम इक्बाल 11, आर्चर 3-35, सॅम करन 2-51, आदिल रशीद 2-21, वोक्स 1-27, रेहान अहमद 1-62), इंग्लंड 43.1 षटकात सर्वबाद 196 (रॉय 19, सॉल्ट 35, व्हिन्से 38, सॅम करन 23, बटलर 26, वोक्स 34, शकीब अल हसन 4-35, टी इस्लाम 2-52, इबादोत हुसेन 2-38, रेहमान 1-25, मेहदी हसन 1-46).