वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
बुधवारपासून येथे सुरू होणाऱ्या विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी यजमान दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघात दोन फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे. या कसोटीसाठी केशव महाराज आणि सायमन हार्मेर हे फिरकी गोलंदाज असून रेयान रिक्लेटन या फलंदाजाचा समावेश आहे.
दोन सामन्यांची ही कसोटी मालिका आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जात असली तरी या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दक्षिण आफ्रिका आणि विंडीज या दोन्ही संघांचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत 87 धावांनी विजय मिळवून आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ आता ही दुसरी कसोटी जिंकून विंडीजचा व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर विंडीजचा संघ ही कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी प्रयत्न करेल.
या दुसऱ्या कसोटीसाठी द. आफ्रिकेच्या संघामध्ये हार्मेर आणि केशव महाराज या दोन फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवले जाणार आहे. तसेच मध्यफळीत रिक्लेटनला संधी देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिका संघ- एल्गार, माक्रेम, टोनी डी झोर्जी, बहुमा (कर्णधार), रिक्लेटन, क्लेसन, मुल्डेर, हार्मेर, केशव महाराज, कोझी आणि रबाडा.