वृत्तसंस्था/ सेंट जोन्स (अँटीग्वा)
गुरूवारपासून येथे सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत विंडीजच्या वेगवान गोलंदाजांच्यासमोर बांगलादेशचा पहिला डाव 103 धावांत गारद झाला. त्यानंतर दिवसअखेर विंडीजने पहिल्या डावात 2 बाद 95 धावा जमविल्या. या कसोटीतील खेळाचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजविताना एकूण 12 गडी बाद केले.
विंडीजने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजच्या भेदक वेगवान गोलंदाजीसमोर बांगलादेशचा डाव 32.5 षटकांत 103 धावांत आटोपला. बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू कर्णधार शकीब अल हसनने एकाकी लढत देत 67 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 51 तर तमीम इक्बालने 43 चेंडूत 4 चौकारांसह 29, लिटॉन दासने 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. बांगलादेशच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यांच्या सहा फलंदाजांना आपले खातेही उघडता आले नाही. विंडीजतर्फे सिलेस आणि जोसेफ यांनी प्रत्येकी 3 तर केमर रोश आणि मेयर्स यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
विंडीजच्या डावाला बऱयापैकी सुरूवात झाली. कर्णधार ब्रेथवेट आणि कँपबेल यांनी सलामीच्या गडय़ासाठी 44 धावांची भागिदारी केली. रेहमानने कँपबेलचा त्रिफळा उडविला. त्याने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 24 धावा जमविल्या. इबादत हुसेनने रिफेरला 11 धावांवर झेलबाद केले. कर्णधार बेथवेट 4 चौकारांसह 42 तर बॉनेर 1 चौकारांसह 12 धावांवर खेळत आहेत. बांगलादेशतर्फे रेहमान आणि हुसेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पहिल्या दिवसापासूनच यजमान विंडीजने कसोटीवर आपली पकड अधिक मजबूत केली आहे.
संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश प. डाव-32.5 षटकांत सर्वबाद 103 (तमीम इक्बाल 29, शकीब अल हसन 51, लिटॉन दास 12, सिलेस 3-33, जोसेफ 3-33, मेयर्स 2-10, रोश 2-21), विंडीज प. डाव- 48 षटकांत 2 बाद 95 (ब्ा्रsथवेट खेळत आहे 42, कँपबेल 24, रिफेर 11, बॉनेर खेळत आहे 12, रेहमान 1-10, हुसेन 1-18).