गणरायाच्या आगमनाने जिल्हय़ात आनंदोत्सव
प्रतिनिधी/ सातारा
गणपती बाप्पा मोरया, गजानना मोरया अशा घोषणा देत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांचे वाजतगाजत घरोघरी स्वागत केले. गणपती बाप्पांची मूर्ती आणण्यासाठी साताऱयातील कुंभारवाडय़ात, बाँम्बे रेस्टॉरंट पुलाखाली अलोट गर्दी झाली होती. बाँम्बे रेस्टॉरंट पुलाखाली यात्रेचे स्वरुप आले होते. दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठय़ा उत्साहामध्ये साजरा होत असून जिह्यात सुमारे साडेतीन हजार गणेशोत्सव मंडळांनी लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. स्वागत मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांना पसंती दिल्याचे पहायला मिळत होते.
कोरोनाच्या काळात कोणताही सण उत्सव साजरा करता आला नव्हता. दोन वर्षाच्या कालखंडानंतर बाप्पांचे आगमन होत आहे. त्याकरता सातारा शहरासह जिह्यातील गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचा व भक्तांचा अमाप उत्साह पहायला मिळत आहे. बाप्पांचे आगमन मुहूर्तावर व प्रतिष्ठापना मुहूर्तावर करण्यासाठी सकाळपासूनच लगबग पहायला मिळत होती. मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून बुकींग केलेल्या मूर्तीच्या ठिकाणी कुंभारवाडय़ात जाऊन वाहनावरुन वाजतगाजत पारंपारिक वाद्यात मिरवणुका काढण्यात येत होत्या. मिरवणुकांमध्ये प्राधान्यांने बॅँड, ढोल पथकांचा समावेश पहायला मिळत होता. सायंकाळपर्यंत बाप्पांचे आगमन घरोघरी होत होते.
बाँम्बे रेस्टाँरंट पुलाखाली यात्रेचे आले स्वरुप
दोन वर्षाच्या काळानंतर होत असलेल्या उत्सवाला साताऱयात यात्रेचे स्वरुप पहिल्याच दिवशी आले होते. गणेश भक्तांनी आपल्या बुक केलेल्या मूर्ती मूर्तीकारांकडून नेण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे बाँम्बे रेस्टाँरंट चौकात सर्वच दुकाने लागली होती. मंडळांचे कार्यकर्ते व गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पांना नेण्यासाठी येत होते, जात होते. त्यामुळे यात्रेचे स्वरुप या परिसराला आले होते.
सातारा शहरासह जिह्यात साडेतीन हजार गणेशोत्सव मंडळांकडून प्रतिष्ठापना
सातारा शहरासह जिह्यात साडे तीन हजार गणेशोत्सव मंडळांनी प्रतिष्ठापना केली आहे. सातारा शहरात सुमारे अधिकृत आणि अनाधिकृत असे 400 मंडळांनी बाप्पांची प्रतिष्ठापना केली. तर जिह्यात सर्वच गावोगावी गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळत आहे.
शासकीय कार्यालयामध्ये गणेशोत्सव
सातारा शहरात अनेक शासकीय कार्यालयामध्ये गणेशोत्सव साजरा होत असून तेथील कर्मचाऱयांच्यावतीने बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आदी ठिकाणी गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.