Bavalat and Satuli villagers hit the ST station
गावातील बससेवा सुरळीत व नियमित करण्याची मागणी
सातुळीसह बावळाट गावात जाणारी बससेवा सुरळीत व नियमित नसल्याने गेले पाच सहा महिने या दोन्ही गावातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याबाबत एस टी प्रशासनाचे लक्ष वेधुनही दुर्लक्ष करण्यात आल्याने या दोन्ही गावातील संतप्त प्रवाशांसह विद्यार्थ्यांनी सावंतवाडी एस टी आगाराला धडक देत याचा जाब एसटी स्थानक प्रमुख नरेंद्र बोधे आणि वाहतूक निरीक्षक संकेत पवार यांना विचारला. या चर्चेदरम्यान स्थानक प्रमुख नरेंद्र बोधे यांनी नेहमीचीच थातुर मातुर उत्तरे दिल्यामुळे उपस्थित संतप्त ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. त्यानंतर स्थानक प्रमुख नरेंद्र बोथे यांनी येत्या चार दिवसात या दोन्ही गावातील बस सेवा सुरळीत व नियमित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.
सातुळी आणि बावळाट या दोन्ही गावासाठी सावंतवाडी बसस्थानकातून पहाटे साडेपाच, सकाळी सव्वा नऊ आणि दुपारी सव्वा बारा अशा तीन बस सुरू आहेत.परंतु या बसेस नियमित वेळेत सुटत नसल्यामुळे या दोन्ही गावातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याबाबत स्थानक प्रमुख नरेंद्र बोथे यांचे अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच संदीप गावडे, दया परब स्वप्नील परब यांच्यासह ग्रामस्थांनी स्थानक प्रमुख नरेंद्र बोथे यांना धारेवर धरले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, सातुळी बावळाट उपसरपंच स्वप्निल परब, माजी उपसरपंच बाबल बुराण, दया परब, सुरेश कदम, सुनिल कानसे, दशरथ परब, गोविंद परब, बाबु सावंत, एकनाथ परब, शांताराम सावंत, उत्तम ठाकुर, प्रकाश कांबळे, सुजय परब, मोहन जाधव, कृष्णा सावंत, तुषार लातये, गिरीष गावडे, खेमराज सावंत, विनीत कदम, सूरज परब, प्रांजली पराब स्नेहा परब, प्रमया परब, वैष्णवी बिरोडकर, सोमाजी परब, सहदेव बिरोडकर, दिनेश गावडे आदी बावळाट व सातुळी गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
ओटवणे प्रतिनिधी