जिल्हाधिकाऱ्यांची अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना : जि. पं. मध्ये कार्यशाळा
बेळगाव : विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांना यासाठी कार्यशाळा सुरू करण्यात आल्या असून शुक्रवारी जिल्हा पंचायतच्या कार्यालयामध्ये कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, निवडणूक ही अत्यंत शांततेत आणि नियोजनरित्या पार पडण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती घ्यावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हा पंचायतच्या सभागृहामध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवडणूक ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली पाहिजे. त्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करा. मतदान केंद्राच्या परिसरात निवडणूक आयोगाने जे नियम सांगितले आहेत. त्याचे काटेकोर पालन करावे. त्यासाठीही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करा, असे त्यांनी सांगितले.
काही ठिकाणी मतदारांमध्ये भीती निर्माण केली जाते. ती भीती दूर करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन मतदारांना विश्वासात घेवून त्यांना मतदान करण्याचे आवाहन करावे, असेही सांगण्यात आले. शहरातील एका मतदान केंद्रामध्ये 1500 मतदारांना मतदान करण्याची सोय करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागामध्ये 1200 हून अधिक मतदारांना मतदान करण्यासाठी सोय करण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी मतदान केंद्रांची संख्या वाढवावी लागणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणूक ही अत्यंत भयमुक्त झाली पाहिजे. पारदर्शकपणे व निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक झाली पाहिजे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले. निवडणूक केंद्राजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांनी आतापासूनच नियोजन करावे. कोणकोणत्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी सूचना कराव्यात. नवीन ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट यंत्रे आणण्यात आली आहेत. त्याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी त्याचे योग्यप्रकारे शिक्षण घ्यावे, असेदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी मनपा आयुक्त रुद्रेश घाळी, प्रांताधिकारी बलराम चव्हाण, जिल्हा पंचायतीचे मुख्य लेखाधिकारी परशुराम दुडगुंटी, बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.