युरोपमध्ये खाद्यतेलाची कमतरता
युरोप सध्या खाद्यतेलाच्या कमतरतेला तोंड देत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचा विशेषकरून सूर्यफुल तेलाचा पुरवठा प्रभावित झाला आहे. यामुळे युरोपीय देशांपर्यंत खाद्यतेल पोहोचत नसल्याची स्थिती आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल्सची स्थिती तर अधिकच खराब आहे. इच्छा असूनही या रेस्टॉरंट्सना स्वतःच्या ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा खाद्यपदार्थ पुरविता येत नसल्याचे चित्र आहे.
या समस्येपासून वाचण्यासाठी जर्मनीच्या एका पबने अनोखी पद्धत अवलंबिली आहे. म्युनिचच्या या पबने सूर्यफुल तेलाच्या बदल्यात तितक्याच प्रमाणात बियर देण्याची ऑफर दिली आहे. या ऑफरनंतर मोठय़ा संख्येत लोक खाद्यतेलाच्या बदल्यात बियर घेण्यासाठी पोहोचत आहेत. यामुळे पबमधील खाद्यतेलाच्या कमतरतेची समस्या निकालात निघाली आहे.
रशिया आणि युक्रेन हे जगातील सर्वात मोठे सूर्यफुल तेल उत्पादक देश आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी जगभरातील गरजेच्या 80 टक्क्यांपर्यंत खाद्यतेल रशिया आणि युक्रेनमधून येत होते. युरोपमध्ये सूर्यफुल तेलाचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. युद्धानंतर हे तेल युरोपमध्ये पोहोचत नसल्याचे चित्र असल्याने अनेक देशांमध्ये खाद्यतेलाचे मोठे संकट उभे राहिले आहे.
म्युनिचच्या पबची ऑफर समोर आल्यावर बहुतांश लोक घरातून एक किंवा अर्धी बाटली खाद्यतेल आणून त्या बदल्यात बियर पित होते. परंतु एक व्यक्ती युद्धप्रभावित लोकांना मदत करण्यासाठी युक्रेनमध्ये गेला होता. तेथून त्याने 80 लिटर सूर्यफूल तेल आणून त्या बदल्यात स्वतःच्या बर्थडे पार्टीकरता 80 लिटर बियर मिळविली आहे.
जर्मनीत एक लिटर सूर्यफूल तेलाची किंमत सर्वसाधारणपणे 4.5 युरो आहे. तर एक लिटर बियरसाठी 7-8 युरो खर्च करावे लागतात. पबच्या या ऑफरमुळे लोकांना अत्यंत किफायतशीर दरात बियर मिळत आहे. या पबमधून आतापर्यंत लोकांनी खाद्यतेलाच्या बदल्यात 400 लिटरहून अधिक बियर रिचविली आहे.