पुणे / वार्ताहर :
देशभरात गाजलेल्या उमेश पाल हत्याकांडातील आरोपी आणि उत्तरप्रदेशातील गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा असद एन्काउंटरपूर्वी फरार असताना पुण्यात आणि नाशिकमध्ये वास्तव्य करून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गुरूवारी असद आणि त्याच्या साथीदाराचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला. मात्र, तत्पुर्वी दीड महिने दोघेही पसार असताना त्यांना पुणे आणि नाशिकमध्ये काही दिवस राहण्यासाठी गुंड अबू सालेम याच्या शार्पशूटरांनी मदत केल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांकडून याची खातरजमा करण्यात येत आहे. मात्र, या प्रकराबाबत पुणे पोलिसांनी दुजोरा दिला नाही.
उत्तर प्रदेशातील आमदार राजू पाल यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल यांची गँगस्टर असद आणि त्याचा शार्पशूटर गुलाम यांनी हत्या केली होती. त्यानंतर मागील दीड महिन्यांपासून ते पोलिसांना चकवा देत गायब झाले होते. त्यांना वाचविण्यासाठी गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाउ अश्रफ अहमद प्रयत्न करीत होते. दरम्यान, अश्रफने गुंड अबू सालेम याच्या साथीदारांच्या मदतीने असद आणि गुलामला पुण्यात आणि नाशिकमध्ये राहण्यासाठी मदत केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांकडूनही प्रकरणाची खातरजमा करण्यात येत आहे. दरम्यान या गुह्याच्या अनुषंगाने उत्तरप्रदेश पोलीस देखील महाराष्ट्र पोलिसांच्या संपर्कात आहेत.